*ग्राम विकासातून राष्ट्र विकास होईल*- -सोनल गुरव
वैभववाडी
युवा शक्तीच्या माध्यमातून ग्राम विकास आणि ग्राम विकासातून राष्ट्र विकास होईल असे मत नावळे गावच्या सरपंच सोनल गुरव यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या निवासी श्रम संस्कारांच्या उद्घाटक प्रसंगी व्यक्त केले.
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागांच्यावतीने नावळे येथे आयोजित सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिराचा उद्घाटन समारंभ मंगळवार दिनांक १६ डिसेंबर रोजी संस्थेचे विश्वस्त श्री. शरदचंद्र रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर स्थानिक समिती सचिव श्री.प्रमोद रावराणे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.नामदेव गवळी, उपप्राचार्य डॉ. मारुती कुंभार, नावळे गावाच्या सरपंच कु.सोनल गुरव, उपसरपंच व अधिक्षक श्री.संजय रावराणे, तंटामुक्त समिती अध्यक्ष व ग्राम पंचायत सदस्य श्री.संजय शेळके, पोलीस पाटील श्रीम. स्नेहा शेळके, जिल्हा परिषद शाळा नावळेचे मुख्याध्यापक श्री.संतोष भरडकर, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री.रमेश गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
माझ्या व्यक्तिमत्व विकासात महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना या अभ्यासे-तर विभागाचा मोठा वाटा आहे. आज सरपंच म्हणून काम करीत असताना ग्राम विकासातून राष्ट्र विकास साधण्याचा प्रयत्न करीत आहे. आपल्या सारख्या युवा शक्तीच्या माध्यमातून ग्राम विकासातून राष्ट्र विकास साधण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाने निवासी शिबिरासाठी आमच्या नावळे गावाची निवड केल्याबद्दल आभार व्यक्त करुन पूर्ण सहकार्य करण्यात येईल असे सरपंच सोनल गुरव यांनी सांगितले.
उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. शरदचंद्र रावराणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी एका लहान पण प्रेरणादायी गोष्टीद्वारे विद्यार्थ्यांना जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश दिला. सात दिवसीय निवासी शिबिरात विविध कार्यक्रम व उपक्रमातून स्वतः बरोबरच समाजाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे सांगून शिबिराला
शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री.प्रमोद रावराणे, प्रभारी प्राचार्य डॉ.नामदेव गवळी, उपप्राचार्य डॉ.मारूती कुंभार, उपसरपंच श्री.संजय रावराणे व मुख्याध्यापक श्री.संतोष भरडकर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरार्थीना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. विजय पैठणे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.सत्यजित राजे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सतिश करपे यांनी मानले.
