एकत्रित आयुष्मान- फुले जन आरोग्य योजनेची जिल्हा समिती बैठक संपन्न
उत्कृष्ट रुग्णालयांचा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते गौरव
• ४.९२ लाख नागरिकांचे आयुष्मान कार्ड तयार
• उर्वरितांसाठी विशेष मोहीम
सिंधुदुर्गनगरी
सामान्य कुटुंबांसाठी आजारपणामुळे येणारा आर्थिक भार दूर करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या एकत्रित महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या सर्वसामान्यांसाठी वरदान ठरत आहेत. या योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना प्रति कुटुंब प्रति वर्ष रुपये ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य विमा संरक्षण देण्यात येत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.
एकत्रित महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत स्थापन जिल्हा सनियंत्रण समिती व तक्रार निवारण समितीची बैठक आज जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा समन्वयक डॉ गोरुले आदी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान आयुष्मान कार्ड निर्मिती व वाटपाचा जिल्हास्तरीय आढावा घेण्यात आला. आतापर्यंत जिल्ह्यातील ४,९२,६१२ नागरिकांची आयुष्मान कार्डे तयार झाली असून, उर्वरित पात्र लाभार्थ्यांसाठी विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी दिले तसेच योजनेच्या लाभापासून कोणताही पात्र नागरिक वंचित राहू नये यासाठी सर्व नागरिकांनी दि. ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी आपले आयुष्मान कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील योजनेअंतर्गत अंगिकृत शासकीय व खाजगी रुग्णालयांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून रुग्णांना दर्जेदार, पारदर्शक व मोफत उपचार उपलब्ध करून देणाऱ्या रुग्णालयांचा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.
एकत्रित योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष रुपये ५ लाखांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण देण्यात येत असून, सध्या १३५६ आजारांवर मोफत उपचार अंगिकृत रुग्णालयांत उपलब्ध आहेत. ही संख्या आगामी कालावधीत २३९९ आजारांपर्यंत वाढविण्यात येणार असून, अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचाही योजनेत समावेश करण्यात आला आहे.
गौरविण्यात आलेली रुग्णालये :
* शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बांबुळी
* ग्रामीण रुग्णालय, देवगड
* अंकुर हॉस्पिटल, मालवण
* डॉ. गद्रे आय केअर सेंटर, वेंगुर्ला
* लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे
