दिविजा वृद्धाश्रमात गीत रामायण कार्यक्रमाने आजी–आजोबांच्या जीवनात आनंदाची स्वरगंगा
कणकवली
असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात दिविजा वृद्धाश्रम व दीक्षित फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वृद्धाश्रमातील आजी–आजोबांना गीत रामायणाचा मनमुराद आनंद घेता यावा, या उद्देशाने आश्रमाचे सचिव श्री. संदेश शेट्ये यांनी दीक्षित फाउंडेशनच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला.
दीक्षित फाउंडेशन ही कोकणातील ग्रामीण भागातील गरजवंतांसाठी कार्य करणारी संस्था असून शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच मराठी संस्कृती जपण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. संस्थेचे संस्थापक श्री. निरंजन दीक्षित हे स्वतः आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध ठिकाणी मराठी गीतांचे कार्यक्रम आयोजित करीत असतात.
दिविजा वृद्धाश्रमात आजी–आजोबांना कायम आनंदी ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. दत्त जयंतीच्या निमित्ताने आश्रमातील कर्मचारी श्रीम. भारती गुरव यांच्या सुस्वर भजनाने वातावरण भक्तिमय झाले. त्यानंतर झालेल्या गीत रामायण कार्यक्रमामुळे आजी–आजोबांच्या उत्साहात अधिक भर पडली. घरापासून दूर असलेल्या आजी–आजोबांना या कार्यक्रमामुळे नवचैतन्य मिळाले असून, आपण येथे एक नवे कुटुंब मिळवले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
वयोमान व शारीरिक व्याधींमुळे जीवनात आलेल्या निराशेवर मात करून दिविजा वृद्धाश्रमामुळे जीवनाची ‘सेकंड इनिंग’ आनंदाने जगत असल्याचे समाधान आजी–आजोबांनी व्यक्त केले.
या गीत रामायण कार्यक्रमात गायक श्री. विनोदजी गोखले, तबलावादक श्री. संदीप फडके, श्री. गौरव पाटणकर, तालवाद्य कलाकार श्री. उदय मेस्त्री व श्री. तुषार सुतार यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी आश्रमाचे सचिव श्री. संदेश शेट्ये यांनी उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. कार्यक्रमास आश्रमातील सर्व आजी–आजोबा, कर्मचारी वर्ग, श्री. प्रकाश पावसकर, श्री. संजय गोरुले तसेच कोळोशी व असलदे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
