You are currently viewing वंचित राहिलेल्या ९७० शेतकऱ्यांना फळपीक विमा नुकसानीची रक्कम मिळवून द्या

वंचित राहिलेल्या ९७० शेतकऱ्यांना फळपीक विमा नुकसानीची रक्कम मिळवून द्या

*वंचित राहिलेल्या ९७० शेतकऱ्यांना फळपीक विमा नुकसानीची रक्कम मिळवून द्या*

*वैभव नाईक व सतीश सावंत यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत केली मागणी*

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९७० शेतकऱ्यांना अजूनही फळपीक विम्याची रक्कम मिळालेली नाही त्यामुळे आज माजी आमदार वैभव नाईक व जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची ओरोस येथे भेट घेऊन वंचित राहिलेल्या त्या ९७० शेतकऱ्यांना फळपीक विमा नुकसानीची रक्कम देण्यात यावी अशी मागणी केली. या मागणीवर जिल्हाधिकारी यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधिक्षक भाग्यश्री ननावरे, भारतीय कृषी विमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक अतुल झनकर, विमा कंपनीचे अधिकारी विरेश अंधारी व संकेत नाईक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना वैभव नाईक व सतीश सावंत म्हणाले, गेली ३ ते ४ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमवेत आम्ही पाठपुरावा करत असल्याने विमा कंपनीकडून फळपीक विम्याची जास्तीत जास्त रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्यात आम्ही यशस्वी होत आहोत. मागील वर्षी २०२४ -२५ मध्ये सुमारे ४२ हजार शेतकऱ्यांनी फळपीक विमा उतरविला होता. परंतु त्यातील ९७० शेतकऱ्यांना अजूनही फळपीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना फळपीक विम्याची रक्कम मिळाली पाहिजे अशी मागणी आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

वैभव नाईक व सतीश सावंत पुढे म्हणाले, यावर्षी २०२५-२६ मध्ये देखील सुमारे ४५ हजार शेतकऱ्यांनी काजू आणि आंबा पिकांचा फळपीक विमा उतरविला आहे. त्याचे नुकसानीचे टिगर दर महिन्याला जाहीर करण्यात यावेत. त्याचबरोबर दरमहिन्याला याबाबतची आढावा बैठक घ्यावी. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात अशी विनंती जिल्हाधिकारी यांना आम्ही केली आहे. त्यावर जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून विमा कंपनीनेही १५ जूनपर्यंत टिगरच्या आधारे नुकसानीची रक्कम जाहीर करण्याचे मान्य केले आहे. तसेच २०२५-२६ चा फळपीक विमा भरण्यासाठी राज्य सरकारने १५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्याचे सांगितले होते. मात्र त्याबाबतचा कुठलाही आदेश कृषी विभागाकडे न आल्याने हि मुदतवाढ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली नाही.यावर नाराजी व्यक्त करत फळपीक विमा योजनेला मुदतवाढ मिळावी अशी मागणी आम्ही केली असल्याचे त्यांनी सांगितले. हवामानाचे मोजमाप करण्यासाठी ५६ हवामान केंद्रे आहेत. परंतु त्यातील काही हवामान केंद्रे नादुरुस्त आहेत.त्याकडे जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधण्यात आले. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये हवामान केंद्र सुरु करण्यासाठी शासनाने जीआर काढला आहे. त्याच्या पुढील कार्यवाहीचा आढावा घेण्याची देखील विनंती जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असल्याचे वैभव नाईक व सतीश सावंत यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा