You are currently viewing इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत बॉलिवूडमधील ‘कपूर’ गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध

इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत बॉलिवूडमधील ‘कपूर’ गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध

*इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत बॉलिवूडमधील ‘कपूर’ गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध*

पिंपरी

द ग्रेटेस्ट शोमॅन ऑफ इंडियन फिल्म इंडस्ट्रीज अर्थातच राज कपूर यांच्या जयंतीनिमित्त आय एम सी अर्थात इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत ‘गाता रहे मेरा दिल’ या उपक्रमांतर्गत ४१ व्या ‘द कपूर्स ऑफ बॉलिवूड’ या विशेष नि:शुल्क सांगीतिक मैफलीचे आयोजन निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर प्रेक्षागृह येथे रविवार, दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले होते. राखी झोपे यांची निर्मिती आणि संकल्पना तसेच अनिल झोपे यांच्या संयोजनातून राज कपूर ते रणबीर कपूर असा पंचाहत्तर वर्षांतील हिंदी चित्रपटगीतांचा सुरेल अमृतमहोत्सवी प्रवास माजी उपमहापौर शैलजा मोरे, अनुप मोरे स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अनुप मोरे, खजिनदार आणि सामाजिक कार्यकर्ते सलीम शिकलगार यांच्या प्रमुख उपस्थितीत साकार करण्यात आला.

बॉलिवूडमधील तमाम कपूर्स यांच्यावरील रजतपटावर चित्रित झालेल्या, मन्ना डे ते अरिजीत सिंग आणि लता मंगेशकर ते सुनिधी चौहान या मूळ गायक कलाकारांनी गाऊन अजरामर केलेल्या अवीट गोडीच्या गीतांना सुनील सांडगे, नम्रता सारडा, क्षितिज उत्तरवार, अनिल झोपे, गौरी पाटील, ओंकार पटवर्धन, श्रेया महाबळेश्वरकर, नयना कालकर, प्राची कर्णिक, धनंजय टांकसाळे, स्वप्निल शेठ, किरण मंगनानी, अमिता जाधव, अदिती खटावकर, अभय चिद्री, विकी थोरात, सुयश गोडबोले, श्रीया दास या आय एम सी च्या कसलेल्या गुणवान गायक कलाकारांनी समरसून सादर करीत श्रोत्यांकडून उत्स्फूर्त दाद मिळवली. मैफलीत ‘हर किसी को नही…’ , ‘जाने कहाँ गये वो दिन…’ , ‘वो चाँद खिला…’ , ‘बेहता हैं मन…’ , ‘दिलहारा…’ , ‘ये गलीयाँ ये चौबारा…’ , ‘हमने तुमको देखा…’ , ‘हवा हवाई…’ , ‘सन सनन…’ , ‘गुस्ताख दिल…’ या एकल आणि ‘प्यार हुआ इकरार हुआ…’ , ‘रिमझिम रिमझिम…’ , ‘तेरे मेरे होटों पे…’ , ‘काटे नही कटते…’ , ‘फलक तक चल…’ , ‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे…’ , ‘पायलीयाँ…’ , ‘परबत के उसपार…’ , ‘एक मैं और एक तू…’ , ‘भँवरे ने खिलायाँ फुल…’ , ‘बिडी जलायले…’ , ‘नजरे मिली…’ , ‘डफलीवाले…’ या युगुल आणि द्वंद्व स्वरातील एकाहून एक सुंदर, वैविध्यपूर्ण गीतांच्या प्रभावी सादरीकरणातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ‘पर्दा हैं पर्दा…’ या लोकप्रिय कव्वालीचे गायक आणि कोरस साथीदारांनी खास कव्वालांची वेषभूषा परिधान करून केलेल्या चपखल सादरीकरणाने धमाल उडवून दिली. ‘मैं तो रस्ते से जा रहाँ था…’ या उडत्या चालीतील गीतावर प्रेक्षागृहातील एका अपंग व्यक्तीला हातातील कुबड्यांसह नृत्य करण्याचा मोह आवरता आला नाही; तर समारोप प्रसंगी ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे…’ या सदाबहार गीताच्या सादरीकरणात सर्व गायक कलाकारांसह रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त नृत्य करीत ‘कपूर’गीतांची मोहिनी आजही कायम असल्याचे सिद्ध केले.

चिंतन मोढा आणि समूहाने संगीत संयोजन केले. म्युझिक व्हिजनने ध्वनिसंयोजन केले. विक्रम क्रिएशन्सने तांत्रिक साहाय्य केले. संजय वाघचौरे यांनी छायाचित्रण केले.
दीपक निस्ताने, धनश्री भोळे, प्रशांत चौधरी, निखिल वाणी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मौलिक सहकार्य केले. मिलिंद बावा यांच्या खुमासदार आणि मार्मिक निवेदनामुळे मैफल अधिकच रंगतदार झाली.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा