उपजिल्हा रुग्णालय कृती समितीकडून प्रशासनाला निवेदन
सावंतवाडी : मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आरक्षित भूखंडाची जागा विकसित करण्याबाबत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समिती, सावंतवाडी यांच्या वतीने सावंतवाडीकडून न. प. मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, टाउन प्लॅनिंग अंतर्गत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी सन २०१९ मध्ये जागा आरक्षित करण्यात आली आहे. मात्र, या संदर्भात संबंधित विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस हालचाल करण्यात आलेली नाही. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची ही जनतेची अत्यंत महत्त्वाची मागणी असून, जमीन मालकही योग्य शासकीय मोबदल्याने जागा देण्यास तयार आहेत. याबाबतचे पत्र जमीन मालकांनी २६/११/२०२५ रोजी कार्यालयात दिलेले आहे.
तरीही यावर अद्याप कार्यवाही न झाल्याने प्रशासनाने तातडीने योग्य ती पावले उचलावीत, अशी ठाम मागणी कृती समितीने केली आहे. यावेळी मुख्याधिकारी यांच्या वतीने तहसीलदार श्रीधर पाटील यांनी हे निवेदन स्वीकारले.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर, अण्णा देसाई, किशोर चिटणीस, महेश परुळेकर, काका मांजरेकर, रवी जाधव, रूपा मुद्राळे, रविंद्र ओगले, राजू कासकर, संजय लाड, कौस्तुभ पेडणेकर, नंदू घाटे, जितेंद्र मोरजकर, राजू केळुसकर, फ्रान्सिस रॉड्रिक्स, नारायण पंतवैद्य, मुकुंद गवंडळकर आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते.
