स्वतंत्र कोकणराज्य अभियानतर्फे मुंबईत सन्मान; सामाजिक कार्याची दखल
कुडाळ :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळचे प्रख्यात वकील अॅड. राजीव दत्ताराम बिले यांना ‘स्वतंत्र कोकणराज्य’ अभियानांतर्गत ‘कोकणरत्न पदवी’ सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. हा पदवीप्रदान सोहळा मुंबई येथील आझाद मैदान, मराठी पत्रकार भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी स्वतंत्र कोकणराज्य अभियानचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे, वरिष्ठ पत्रकार व संपादक सचिन कळझूनकर, मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर, युवानेते सचिन गावडे, खजिनदार राजेंद्र सुर्वे, अजित गोरुले, बापू परब, मुकेश जय, निहार कोकरे, अनिकेत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
अॅड. राजीव बिले गेली अनेक वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक व आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थांत कार्यरत आहेत. ते अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्गचे अध्यक्ष असून, रोटरी क्लब ऑफ कुडाळचे संस्थापक अध्यक्ष तसेच रोटरी सेवाप्रतिष्ठान कुडाळचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या या अतुलनीय सामाजिक कार्याची दखल घेत स्वतंत्र कोकणराज्य अभियान संस्थेच्या वतीने त्यांना मानाची कोकणरत्न पदवी प्रदान करण्यात आली.
कोकणरत्न पदवी मिळाल्याबद्दल ही आयुष्यातील अत्यंत समाधान देणारी गोष्ट असल्याची भावना अॅड. राजीव बिले यांनी व्यक्त केली. तसेच या सन्मानाबद्दल स्वतंत्र कोकणराज्य अभियान संस्थेचे त्यांनी आभार मानले.
