You are currently viewing गावासाठी दोन कोटी देणारा अवलिया दादासाहेब सूर्यवंशी 

गावासाठी दोन कोटी देणारा अवलिया दादासाहेब सूर्यवंशी 

असे दादासाहेब गावोगावी निर्माण झाले पाहिजेत

 

गावासाठी दोन कोटी देणारा अवलिया दादासाहेब सूर्यवंशी

 

दादासाहेब सूर्यवंशी मुक्काम पोस्ट सौंदाणे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या माणसाला मी पाहिले नाही. पण आज फेसबुक वर कोणीतरी टाकलेली पोस्ट पाहिली आणि या माणसावर लिहावेसे वाटले. ज्या अर्थी या माणसाने गावासाठी एक कोटी 75 लाख रुपयांची देणगी दिली त्याअर्थी हा माणूस श्रीमंत तर आहेच पण तेवढाच दिलदारही आहे. ज्या गावात तो शिकला त्या गावासाठी 75 लाख रुपयाची शाळेची इमारत बांधून देणे ही काही साधीसुधी गोष्ट नाही .आज आपण पाहतो जिल्हा परिषदेच्या शाळा मोडकळीस शाळेला आहेत. पण हा माणूस त्या गावात शिकला आणि त्या गावाविषयी त्याला प्रेम आहे आणि म्हणून त्याने हे पाऊल उचलले असावे.

 

शाळेसाठी इमारत बांधून हा माणूस थांबला नाही तर याने गावातील मुले स्पर्धा परीक्षेसाठी चांगली तयार व्हावी यासाठी अभ्यासिका ग्रंथालय देखील सुरू केले. त्यासाठी एक कोटी रुपयाची स्वतंत्र देणगी देऊन ती इमारत देखील त्याने उभारण्यास समर्थ हात लावला. गावातील प्रत्येकच मुलगा नाशिकला पुण्याला दिल्लीला जाऊ शकेल असे नाही. पण गावात जर अभ्यासिका आणि ग्रंथालय उभे राहिले आणि तेही एक कोटी 35 लाखाचे तर तो मुलगा नाही कलेक्टर होईल पण ज्या परीक्षेला बसेल त्या परीक्षा तो पास होईल. समजा पास झालाच नाही तरी त्याचे जे व्यक्तिमत्व तयार होईल ते त्याला जीवनामध्ये उभे राहण्यास मदत करेल.

 

जितने वाले कोई अलग काम नही करते

वह हर काम अलग ढंग से करते है

 

असेच त्या माणसाबद्दल म्हणावे लागेल. खऱ्या अर्थाने आज गावाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आमचा मुलगा अमेरिकेला आहे. आमचा मुलगा बंगलोरला आहे. आमचा मुलगा पुण्याला आहे असे सांगणारे खूप लोक मला भेटतात .पण माझा मुलगा माझ्या गावात राहूनच शेती करीत आहे असा माणूस मला अजून सापडलेला नाही आणि सापडण्याची शक्यताही कमीच आहे . बरं ठीक आहे. तुमचा मुलगा परदेशात आहे. चांगल्या कंपनीत आहे .चांगले पॅकेज आहे. तर मग तो ज्या शाळेमध्ये शिकला. तो ज्या गावामध्ये शिकला .तो ज्या नगरामध्ये शिकला किंवा त्याला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्यासाठी त्यांनी काय केले असे जर विचारले तर समोरचा गृहस्थ निरुत्तर होईल.

 

आमच्या परिचयाचे बरेच प्राध्यापक आपल्या मुलांचे गुणगान करीत असतात. मी मनात विचार करतो आणि त्यांना विचारतो तुमचे विद्यार्थी काय करतात ?. त्यावर ते निरुत्तर होतात. त्यांना एकाही विद्यार्थ्याचे नाव आठवत नाही किंवा माझा हा विद्यार्थी या या मोठ्या पदावर आहे .मी त्याला ही ही मदत केली आहे. हेही ते सांगू शकत नाहीत .कारण की त्यांनी तसे केलेले नसते.

 

मी माझी बायको माझी मुलं या चौकटीत अनेकजण वावरत असतात. तो मानवी स्वभाव आहे. पण जेव्हा दादासाहेब सूर्यवंशी सारखा माणूस जर एक कोटी 75 लाख रुपये देणगी देऊ शकतो तर तुमच्या माझ्यासारखा 1000 रुपये तर देऊ शकतो. पण पुण्या मुंबई बेंगलोर परदेशाची गोष्ट करणारे लोक जेव्हा रविवारच्या इतवारा बाजारात भाजी घ्यायला जातात तेव्हा भाजी घेताना घासाघीस करताना दिसतात. डी मार्ट किंवा बिग बाजारमध्ये मात्र चुपचाप मागेल त्या किमतीला वस्तू विकत घेतात. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. रिक्षावाल्याशी ही माणसे भांडणे करतील . तीही पाच दहा रुपयांसाठी. तुम्ही उधळपट्टी करावी असा या लेखाचा उद्देश नाही .पण थोडी तरी माणुसकी बरोबर आपण जपली पाहिजे.

 

 

 

मी ज्या महाविद्यालयात शिकलो व ज्या महाविद्यालयात मी नोकरी केली त्या अमरावतीच्या केशरबाई लाहोटी महाविद्यालयामध्ये एक प्राध्यापक आहेत. ते आता सेवानिवृत्त झाले आहेत. अमरावतीच्या कॅम्प विभागात विद्याभारती महाविद्यालयाच्या समोर राहतात. प्रा. ज्ञान कोठारी असे त्यांचे नाव. ते माझ्या जवळचे. प्राध्यापक असताना ते प्लॉटचा व्यवसाय पण करायचे. त्यांनी मुलांना चांगले संस्कार दिले. चांगले शिकविले. त्यांच्या आलोक नावाच्या मुलाचा आम्ही अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये सत्कारही केला. त्याने आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले .या कोठारी परिवाराने काय करावे. पैसा तर भरपूर आहे .

मग त्यांनी अमरावती मार्डी रोडवर खंडेलवाल पेट्रोल पंपा मागे असलेल्या राजुरा या गावी अतिशय सुंदर देखणा असा थ्री स्टार वृद्धाश्रम काढला. हा वृद्धाश्रम पाहिला तर एका थ्री स्टार हॉटेलची प्रचिती येते. एवढेच करून आलोक थांबला नाही तर तो ज्या आयआयटी पवईला शिकला त्या आयआयटी पवईला त्याने आठ कोटी रुपयांची देणगी पण दिली. याला म्हणतात परोपकार. याला म्हणतात ऋणातून उतराई होण्याचा मार्ग.

 

गुजरातच्या लोकांचे पहा. त्यांचे दातृत्व पहा. तेथे माझे जे नातेवाईक आहेत ते सगळे पाटीदार आहेत .ते मोठे व्यवसायिक आहेत. मोठा व्यवसाय करतात. आज गुजरात मधला बराचसा व्यवसाय हा पाटीदार समाजाकडे आहे. त्यांच्या टर्नओव्हर हजारो करोडो रुपयात आहे .पण ते तेवढेच दानशूर आहेत .स्पर्धा परीक्षेचे केंद्र गुजरातला काढावयाचे ठरविले तेव्हा त्यांनी आपल्या तिजोरीची दारे स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांसाठी मोकळी केली. पहिले डोनेशन 40 कोटी दुसरे डोनेशन 25 कोटी तिसरे डोनेशन पाच कोटी. पाच कोटीच्या खाली कोणीच डोनेशन दिले नाही .सर्वांचे आकडे पाच कोटीच्या वर होते. आणि स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांसाठी 200 कोटीचे सरदारधाम अहमदाबादला उभे राहिले.

 

असे एकच सरदारधाम बांधून ते लोक थांबले नाहीत .तर त्यांनी गुजरातमध्ये पाच आणि भारतात 19 राज्यात एकोणवीस सरदारधाम निर्माण करण्याचा संकल्प सोडला. तुम्ही कल्पना करा प्रत्येक सरदारधाम 200 कोटीचा आणि असे 19 केंद्र म्हणजे 3800 कोटी रुपये हे पाटीदार स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांसाठी खर्च करणार आहेत.

 

माझे सुरतचे रामजीभाई पाटील नावाचे नातेवाईक आहेत .ते अखिल भारतीय कुर्मी महासभेशी जोडलेले आहेत .ते दरवर्षी दोन कोटी रुपये गरीब विद्यार्थ्यांना देणगी म्हणून वाटतात. मी सुरतला त्यांच्याकडे बसलो होतो .ते मुलांना पैसे वाटत होते .मी खिडकीतून पाहिले. एक कार थांबली. त्यातून एक मुलगा बाहेर आला. रामजीभाईकडे गेला त्याने अर्ज दिला. रामजी भाईंनी त्यांच्या मदतनीसाला सांगितले .मदतनिसांनी त्यांना वीस हजार रुपयांचा चेक दिला. मी रामजीभाईंना म्हटले. रामजीभाई हा मुलगा कारने आलेला आहे. रामजीभाई म्हणाले त्याने माझ्याजवळ मदतीसाठी अर्ज दिलेला आहे .शरण आलेल्याला मरण देऊ नये. तो कारने आला की स्कूटरने आला की पायी आला हे मी पाहत नाही. माझ्याजवळ त्याचा अर्ज आला म्हणजे मी त्याला वीस हजार रुपये देणार आणि दोन कोटी रुपये संपले की मग मी थांबणार .

 

आमच्या मित्र परिवारातील दुसरे मित्र श्री गोविंदभाई ढोलकिया. तुम्ही युट्युबला पहाल गुगलवर पहाल. तर या माणसाची महती तुम्हाला कळेल. रोज दोन तीन लाख रुपये देणगी दिल्याशिवाय हा म्हणून झोपतच नाही. आम्ही राजस्थानमध्ये डुंगरपुर जिल्ह्यात सागवाडा येथे आयएएस सेंटर काढले. गोविंद भाई ढोलकीया यांना उद्घाटक म्हणून बोलाविले. गोविंदभाई कार्यक्रमाला एकटे कधीच जात नाहीत. त्यांच्याजवळ स्वतःची वातानुकुलित बस आहे. त्या बसमध्ये सगळीच व्यवस्था आहे .सात आठ मित्र सोबत घेतात आणि कार्यक्रमाला जातात .त्याप्रमाणे ते आमच्या कार्यक्रमाला आले. स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन केले. गोविंदभाई बोलायला उभे राहिले आणि त्यांनी एक कोटी रुपये स्पर्धा परीक्षा केंद्राला अनुदान दिले .त्यांच्याबरोबर जे सात लोक आले होते त्यांनी देखील प्रत्येकी पाच लाख याप्रमाणे 35 लाख रुपयांची देणगी दिली.

 

सरदार धाम उभारण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे ते गज्जीभाई सुकरिया हे फक्त चौथा वर्ग पास आहेत. चौथा वर्ग शिकणारा माणूस जर प्रत्येकी 200 कोटी रुपयाचे मूल्य असलेले 24 सरदार धाम संपूर्ण भारतात निर्माण करण्याचा संकल्प करतो तेव्हा त्याच्या दिव्यदृष्टीला प्रणाम करावासा वाटतो. या सरदार मध्ये मुलींना फक्त एक रुपयांमध्ये सोळा प्रकारचे स्पर्धा परीक्षेचे ट्रेनिंग देण्यात येते. त्यामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग गुजरात लोकसेवा आयोग बँकिंग रेल्वे स्टाफ सिलेक्शन एनडीए जे डबल इ नीट सगळेच कोर्सेस आहेत. फी वर्षाला एक रुपया. या एक रुपयामध्ये राहणे जेवणे प्रशिक्षण सर्व आले. एक रुपया वार्षिक फी घेणारे हे सरदारधाम हे त्यामुळे नावलौकिकास आले .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या सरदारधामचे उद्घाटन केले. फक्त एक रुपया वार्षिक फी मध्ये स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देणारी ही भारतातील नाही जगातील पहिली संस्था आहे.

 

असे गज्जीभाई सुकरिया रामजी भाई पटेल गोविंद भाई ढोलकिया आलोक ज्ञान कोठारी आणि दादासाहेब सूर्यवंशी जर प्रत्येक गावात निर्माण झाले तर माझं गावच नाही का तीर्थ कशाला पंढरी जातो हा वाकप्रचार प्रत्यक्षात आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज जेव्हा दादासाहेब सूर्यवंशी यांची नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावची बातमी पाहिली तेव्हा मला असं वाटले की नाही माणुसकी अजून जिवंत आहे.प्रत्येक गावात असे दादासाहेब आहेत. या बातमीतून ते प्रेरणा घेतील आणि आपल्या गावाला स्वर्ग करण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा करू या.

 

प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक

मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा