कणकवलीत वैद्यकीय हलगर्जीपणाचा आरोप
युवतीच्या मृत्यूनंतर नातेवाईक व ग्रामस्थ आक्रमक
कणकवली
कणकवली येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान झालेल्या युवतीच्या मृत्यूनंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच युवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयातील डॉक्टरांच्या केबिनला घेराव घातला असून, मृतदेह थेट रुग्णालयाच्या दारात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागातील १९ वर्षीय युवतीच्या डोक्यात गाठ आढळून आल्याने तिला शुक्रवारी कणकवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे गाठ काढण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सायंकाळी सुमारे ५ वाजता शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, शस्त्रक्रियेनंतर युवतीचा रक्तस्त्राव थांबत नसल्याने तिला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले. कोल्हापूरमध्ये उपचार सुरू असताना रविवारी पहाटे तिचा मृत्यू झाला.
जर या रुग्णालयात योग्य उपचार शक्य नव्हते, तर सुरुवातीलाच तिला दुसऱ्या रुग्णालयात पाठवायला हवे होते. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतरच कोल्हापूरला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे युवतीचा हकनाक बळी गेला, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच कोणत्याही आवश्यक चाचण्या न करता शस्त्रक्रिया करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन कणकवली पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली असून ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र ग्रामस्थ ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने सध्या रुग्णालय व परिसरात तणाव कायम आहे.
