You are currently viewing घारपी शाळेतील विद्यार्थ्यांकडून मंदिर परिसराची स्वच्छता मोहीम

घारपी शाळेतील विद्यार्थ्यांकडून मंदिर परिसराची स्वच्छता मोहीम

*घारपी शाळेतील विद्यार्थ्यांकडून मंदिर परिसराची स्वच्छता मोहीम*

*बांदा*

घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील स्काऊट-गाईड तसेच कब-बुलबुल पथकातील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत गावातील माऊली देवी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. माऊली देवीच्या जत्रोत्सवानंतर मंदिर परिसरात कचरा साचलेला असल्याने हा परिसर स्वच्छ करण्याच्या उद्देशाने आनंददायी शनिवार या अंतर्गत हा उपक्रम घेण्यात आला.
विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसर, प्रवेशद्वार, सभामंडप तसेच आजूबाजूचा परिसर साफ केला. प्लास्टिक, कागद, इतर कचरा वेगवेगळा गोळा करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन तसेच सार्वजनिक ठिकाणांची जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यात आली.
या स्वच्छता मोहिमेत शाळेचे मुख्याध्यापक श्री. जे. डी. पाटील यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. राजेंद्र गावकर यांनी सहभागी होत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपशिक्षक आशिष तांदुळे, मुरलीधर उमरे, धर्मराज खंडागळे यांनी नियोजन व मार्गदर्शन केले. यासोबतच अंगणवाडी सेविका संजना गावकर, ग्रामस्थ एकनाथ गावडे, वासुदेव नाईक,हरिअप्पा गावडे, ओंकार गावडे आदिंनी सहकार्य केले.
स्वच्छता शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा यशोदा गावडे यांच्या कुटुंबीयांकडून अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने व शिस्तबद्ध पद्धतीने केलेल्या कामाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत त्यांचे कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा