You are currently viewing विवेकनामा पुरस्काराचे मानकरी – प्रवीण गुल्हाने 

विवेकनामा पुरस्काराचे मानकरी – प्रवीण गुल्हाने 

अमरावती :

शनिवार दि. 13 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित मोर्शी रोडवरील अमरावतीच्या श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालयमध्ये एका युवकाचा प्रतिष्ठित असा राज्यस्तरीय विवेकनामा फाउंडेशनचा प्राचार्य डॅडी देशमुख कार्यकर्ता पुरस्कार देऊन संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री श्री हर्षवर्धन देशमुख सत्कार करण्यात येणार आहेत. त्या युवकाचे नाव आहे प्रवीण गुल्हाने. प्रवीण गुल्हाने विद्यालय व महाविद्यालयीन क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये विज्ञान जागृतीसाठी जे अभूतपूर्व काम केलेले आहे. त्याबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

प्रत्येकाचा एक छंद असतो आणि त्या छंदाला तो माणूस वाहून घेत असतो. तो नफा तोट्याचा विचार करीत नाही. पण अशी माणसे वेगळी असतात आणि मोजके असतात. प्रत्येक जण मी व माझे कुटुंब यामध्ये रमलेला असतो. प्रवीण त्याला अपवाद आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून विज्ञान जागृती करण्याचं महत्त्वाचं काम त्याने केलेले आहे आणि त्यामुळेच या विवेकनामा पुरस्कारासाठी त्याची निवड झाली आहे . यात यापूर्वी देखील तत्कालीन राष्ट्रपती डॉ.श्री अब्दुल कलाम यांनी प्रवीण गुल्हाने यांचा सन्मान केला आहे. राष्ट्रपतीच्या हस्ते सन्मान होणे ही किती मोठी गोष्ट. पण प्रवीण आपल्या वैज्ञानिक कामामुळे ती साध्य करू शकला.

तसं पाहिलं तर प्रवीण हा साधासुधा युवक .मुलांमध्ये रमणारा. युवकांमध्ये रमणारा. त्यांच्यासाठी काहीतरी वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे त्यासाठी त्यांच्यामध्ये जागृती करण्यासाठी त्याने महाराष्ट्र विज्ञान परिषद सारख्या संस्था मार्फत विविध उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविले आहेत. त्यासाठी मानधनाची अपेक्षा नाही .प्रवास खर्चाची अपेक्षा नाही. दिले तरी ठीक .नाही दिले तरी ठीक. खऱ्या अर्थाने काम करणारा व विज्ञाननिष्ठा ठेवणारा युवक म्हणून त्याचा अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात नावलौकिक आहे आणि त्या नावलौकिकाला सार्थ असे काम तो प्रामाणिकपणे करीत आहे.

प्रवीण माझ्या बऱ्याच वर्षापासून संपर्कात आहे. आमचे मिशन आयएएस डॉक्टर पंजाबराव देशमुख. आय ए एस अकादमी आयएएस फाउंडेशन छत्रपती श्री शिवाजी महाराज लोक विद्यापीठ तसेच आमचे ग्रीष्मकालीन शिबिर यामध्ये तो झोकून काम करतो. 1912 पासून तो आमच्या उन्हाळ्यात होणाऱ्या स्पर्धा परीक्षा शिबिरामध्ये मुलांना दुर्बिणीद्वारे आकाशाचे दर्शन घडवतो .मुले इतके आकर्षित होतात की रात्री बारा एक वाजला तरी झोपायला तयार नसतात. प्रवीण त्यांना एक एक तारा दाखवत असतो. मुलांची संख्या जास्त असते. प्रत्येक जनाची धडपड माझा नंबर लागावा यासाठी असते. पण अगदी शेवटच्या मुलाला तारा दाखवल्याशिवाय तो आपला नभांगणाचा कार्यक्रम पूर्ण करीत नाही.

अमरावती जिल्हा मराठी विज्ञान परिषदेचे काम त्याने स्वतःहून स्वीकारले आहे .त्याद्वारे मुलांना विज्ञान विषयक कार्यशाळा फिरते तारांगण खगोलशास्त्र प्रदर्शन सर्प विज्ञान घनकचरा व्यवस्थापन दुर्बिणीद्वारे ग्रह तारे आकाश निरीक्षण पर्यावरण प्रदूषण विज्ञानाचे मनोरंजक प्रयोग तो शाळा महाविद्यालयामध्ये करीत असतो. हाच त्याचा छंद आहे .हाच त्याचा व्यवसाय आहे. पण हा पूर्णपणे व्यावसायिक नाही. प्रवास खर्च मानधन दिले नाही तरी तो कार्यक्रम करतो. कारण की त्याचे लक्ष्यआहे तो विद्यार्थी. हा विद्यार्थी विज्ञाननिष्ठ झाला पाहिजे. हा विद्यार्थी विज्ञानाच्या माध्यमातून जगाच्या अजून जवळ गेला पाहिजे. ही त्याची प्रामाणिक इच्छा आहे आणि त्यासाठी त्याची सातत्याने धडपड असते आणि आजही आहे.

आकाशात सूर्यग्रहण लागणार असेल उल्कापात होणार असेल काही घडामोडी घडत असतील तर सर्वात प्रथम बातमी येते ती प्रवीण गुल्हानेचीच. मग तो कधी माझे सहकार्य घेतो तर कधी डॉ.अविनाश सावजी सरांचे तर कधी प्राचार्य डॉ.व्ही टी इंगोले सरांचे तर कधी प्रा. प्रवीण विधळे तर कधी विजय गिरोळकर यांचे तर कधी डॉ.मंगेश देशमुख यांचे.आमच्या सर्वांच्या सहकार्याने तो आकाशातील ती अद्भुत क्रिया दुर्बिणीद्वारे लोकांना मुलांना दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या या प्रयत्नाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद असतो. कारण तारांगणाबद्दल लोकांना आकर्षण आहे. कुतुहल आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आज तरी समाजामध्ये चांगली व्यवस्था नाही आहे. त्यामुळे प्रवीणच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो.

तो कुठेही नोकरी करीत नाही . तो त्याचा पिंड नाही.विज्ञान दुर्बीण विज्ञान विषयक उपक्रम साहसी कॅम्प यासाठी त्याने स्वतःला वाहून न घेतले आहे.

काही वर्षांपूर्वी तर त्याने व त्याच्या मित्रांनी सायकल द्वारे संपूर्ण महाराष्ट्रात एकता यात्रा पण काढली आहे .त्याचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी आहे .त्यामुळे विज्ञानावर आधारित लघुपट विद्यार्थ्यांना दाखवणे शिबिराचे आयोजन करणे विज्ञानाच्या प्रतिकृती करून मुलांना दाखवणे काष्ट शिल्पाचे प्रदर्शन आयोजित करणे. मुलांना विज्ञान विषयक पुस्तकाचे वाचन करण्यास भाग पाडणे आणि आकाश निरीक्षणाचे कार्यक्रम आयोजित करणे हे त्याच्या अंगवळणी पडलेले आहे.

खरं म्हणजे इतके प्रयोग विज्ञानाचे शिक्षकही करत नाहीत. प्राध्यापक ही करत नाहीत .पण हा मात्र करतो. कारण आकाश दर्शनासाठी वेळ असते रात्रीची .आपण जेव्हा झोपलेलो असतो तेव्हा प्रवीण व प्रवीणच्या संपर्कात असलेले नागरिक व विद्यार्थी आकाशाचे निरीक्षण करत असतात. त्यासाठी त्यांनी कधी प्राचार्य व्ही टी इंगोले सरांचे अमरावती मार्डी रोड वरील ग्रीन हाऊस हे फार्म हाऊस निवडलेले असते. तर कधी नेर पिंगळाई येथील पिंगळाईचे मंदिर तर कधी मालटेकडी तर कधी एस आर पी कॅम्प मधील टेकड्या. तेथे घेऊन तो मुलांना जातो. त्याचा अभ्यास असल्यामुळे मुलं देखील त्याचे ऐकतात आणि रमतात देखील. करील रंजन जो मुलांचे. जडेल नाते त्याचे प्रभूचे .हे त्याच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते.

आमच्या मिशन च्या उपक्रमामध्ये तो सातत्याने सहभागी होतो. कोरोना काळातही तो आमच्याबरोबर होता आणि आजही आहे. त्याचे व्यक्तिमत्त्व एका अर्थाने अष्टपैलू आहे .तो सगळीच कामे करतो .त्यामध्ये तो निपुण आहे .कोरोनाच्या काळामध्ये आमच्या सगळ्या कार्यक्रमांचे पोस्टर्स त्यानेच तयार केले. त्यामुळे आम्ही घराघरात पोहोचू शकलो आणि अकराशे कार्यक्रमाचा उच्चांक गाठू शकलो .

अशा या तत्पर तेजस्वी व तपस्वी तरुणाची विवेकनामा या प्रतिष्ठानने दखल घेतली व त्याला यावर्षीचा राज्यस्तरीय पुरस्कार देण्याचे निश्चित केले .ही खरोखरच तुमच्या आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे .याप्रसंगी मी प्रवीणला मनापासून शुभेच्छा देतो .आपण सर्वजण एकत्र येऊ या. विज्ञाननिष्ठ होऊ या आणि विज्ञान विषयक उपक्रमांना सातत्याने आयोजित करून विद्यार्थ्यांचा विज्ञान विषयक दृष्टिकोन दृढ करू या.

 

प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा