केणीवाड्यातील वस्तीनजीकचा प्रकार;पाळीव प्राण्यांच्या संरक्षणार्थ उपाययोजना करण्याची मागणी
बांदा
सावंतवाडी तालुक्यातील पाडलोसमध्ये वारंवार रानटी प्राण्यांचा उपद्रव सुरूच असल्यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. पाडलोस केणीवाडा येथे शुक्रवारी गुरांच्या पाण्यासाठी लहान बंधारा घालण्यात आला. आज सकाळी त्या बंधाऱ्यावर बिबट्याच्या पावलांच्या खुणा शेतकऱ्यांना दिसून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने योग्य त्या उपाययोजना करून आमच्या पाळीव जनावरांचा रानटी प्राण्यांच्या हल्ल्यातून बचाव करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून हाेत आहे. केणीवाडा येथील शेतकरी अमित नाईक यांना गेल्यावर्षी आंब्याचेगाळू याच ठिकाणी बिबट्याच्या पावलांच्या खुणा दिसल्या होत्या.
सदर माहिती वनविभागाला पाचारण केल्यानंतर वनविभागाने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्या खुणा बिबट्याच्या पावलांचे असल्याचे सांगितले हाेते. बिबट्या पाणी पिण्याच्या उद्देशाने वस्तीनजीक येत असून तो पाळीव प्राण्यांवर सहसा हल्ला करणार नसल्याच्या नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केले होते. यावर्षी पुन्हा पावलांच्या खुणा आढळून आल्याने मात्र शेतकऱ्यांच्या मनात जनावरांबाबत भीती निर्माण झाली आहे. तसेच त्या खुणा बिबट्याचा असल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला आहे.
दरम्यान, पाणी पिण्यासाठी रानटी प्राणी वस्तीत घुसत असून वनविभागाने जंगला नजीकच पाणथळे निर्माण करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून वारंवार होत आहे. परंतु सर्व काही कागदोपत्रीच होत असल्याने प्रत्यक्षात रानटी प्राणी मात्र भरवस्तीत घुसत असल्याचे प्रकार समोर येत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत वनविभागाने छोटे छोटे बंधारे घालून वन्यप्राण्यांना जंगलातच थांबवावे, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे