‘व्हॉईस ऑफ मीडिया’कडून नागपूरात उपोषण;
पत्रकार सुरक्षेसह विविध मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी
नागपूर :
राज्यातील पत्रकार डिजिटल माध्यमे, साप्ताहिके आणि रेडिओ या माध्यमांतील पत्रकारांना भेडसावणाऱ्या गंभीर प्रश्नांबाबत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’, ‘VOM इंटरनॅशनल फोरम’ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधत आजपासून नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे उपोषण सुरू केलं आहे. पंढरपूर येथे नुकत्याच झालेल्या राज्य शिखर अधिवेशनात सर्व संमतीने मंजूर झालेल्या मागण्यांवर तातडीची कार्यवाही करण्याची मागणी येथील उपोषणकर्ते करत आहेत.





शासनाचे प्रतिनिधी म्हणून आयुष्यमान भारतचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी आज आंदोलन स्थळी भेट देऊन पत्रकारांचे निवेदन स्वीकारले आहे, यामध्ये प्रामुख्याने पत्रकारांची सुरक्षा, माध्यम संस्थांची आर्थिक शाश्वतता आणि लोकशाहीतील पारदर्शकता यासाठी शासनाने ठोस निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे असे म्हटले आहे, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली जाहिरात बिले, पडताळणी प्रक्रिया, दरवाढ, डिजिटल माध्यमांची नोंदणी तसेच पत्रकारांसाठी आरोग्य विमा, पेन्शन व संरक्षण यांसह तातडीच्या मुद्यांकडे शासनाने सकारत्मक दृष्टीने पाहण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनामध्ये व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, कोअर कमिटीचे प्रमुख किशोर कारंजेकर, महिला प्रदेशाध्यक्ष रश्मी मारवाडी, नागपूरचे जिल्हाध्यक्ष दिलीप घोरमारे आदिसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 11, 12 आणि 13 डिसेंबर असे तीन दिवस हे उपोषण सुरू राहणार आहे, मागण्या मान्य झाल्याशिवाय व्हाईस ऑफ मीडियातील सर्व पदाधिकारी हे आंदोलन मागे घेणार नाहीत त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पत्रकारांच्या भावना लक्षात घेऊन निवेदनात दिलेल्या मागण्यांवर साधक-बाधक चर्चा करून तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमच्या वतीने करण्यात येत आहे.
