*वैभववाडी महाविद्यालयात ‘स्पोकन इंग्लिश’ प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न*
वैभववाडी
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील इंग्रजी विभाग, अंतर्गत दर्जा हमी कक्ष (IQAC) आणि प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान ( PM-USHA) यांच्या संयुक्त विद्यमाने दि.९ ते ११ डिसेंबर २०२५ या कालावधीत ‘ट्रेनिंग प्रोग्रॅम ऑन स्पोकन इंग्लिश’ तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. ग्रामीण भागातील कनिष्ठ व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना औपचारिक व अनौपचारिक इंग्रजी संभाषण, मुलाखत व गटचर्चेची तयारी, शब्दसंग्रहवृद्धी, तसेच प्रभावी इंग्रजी वक्तृत्व या कौशल्यांची माहिती देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे स्थानिक समिती अध्यक्ष श्री.सज्जनकाका रावराणे, संस्थेचे विश्वस्त श्री.शरदचंद्र रावराणे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. नामदेव गवळी, उपप्राचार्य डॉ. मारुती कुंभार, लांजा महाविद्यालयातील प्रा. डॉ. राजेश माळी, कराड महाविद्यालयातील प्रा. डॉ. अरविंद जाधव आणि इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. वंदना काकडे हे मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ. काकडे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन केले.
या तीन दिवसीय प्रशिक्षणात प्रा. डॉ. राजेश माळी यांनी औपचारिक व अनौपचारिक प्रसंगी इंग्रजी भाषेचे महत्त्व स्पष्ट केले. प्रा. डॉ. अरविंद जाधव यांनी शब्दसंग्रह व त्याचा दैनंदिन जीवनातील उपयोग यावर मार्गदर्शन केले. सांगली जिल्ह्यातील सावळज महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सोमनाथ पणदे यांनी मुलाखत, गटचर्चा आणि सार्वजनिक भाषणासाठी आवश्यक आत्मविश्वास व तंत्रे यावर मार्गदर्शन केले. निपाणी महाविद्यालयाचे प्रा. संतोष पाटील (संचालक–तेज स्पोकन इंग्लिश अकॅडमी) यांनी इंग्रजीचा विविध परिस्थितींमधील प्रभावी वापर यावर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांशी आंतरक्रियात्मक संवाद साधला. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये विविध महाविद्यालयांमधून एकूण ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
दिनांक ११ डिसेंबर रोजी झालेल्या समारोप कार्यक्रमात
सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालय प्रशासन आणि इंग्रजी विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले. या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ. संतोष राडे यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्रा. दिनेश बेटकर यांनी केले.
