कळणे येथे ओंकार हत्तीच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू!
वनविभागाचा निष्काळजीपणा उघड : ग्रामस्थ भयभीत
दोडामार्ग
कळणे येथे जंगली ओंकार हत्तीने पुन्हा एकदा हल्ला करत शेतकरी शाहिर इस्माईल खान यांच्या बैलाचा बळी घेतला. मात्र या घटनेत वनविभागाचा सातत्याने चाललेला निष्काळजी कारभार यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप शिगेला पोहोचला आहे.
बुधवार रात्री उशिरा ओंकार हत्ती खान यांच्या शेतात शिरला. दोन जनावरे वनकर्मचाऱ्यांनी सोडवली, पण बैल मात्र दोरीने घट्ट बांधलेला असल्याने सुटू शकला नाही. हाताशी साधन नसल्याने कर्मचारी काही करू शकले नाहीत. दरम्यान आक्रमक हत्तीने बैलाच्या बरगड्या व पाय मोडून त्याला अक्षरशः ठार केले.
“हत्ती चारच दिवस फिरतोय” असं सांगण्यात मग्न राहणाऱ्या विभागाने संरक्षणाची कोणतीच ठोस तयारी न केल्याची खुली कबुली या घटनेतून मिळाली, असे ग्रामस्थ म्हणतात.
‘प्राणी मित्र’ हत्तीवर प्रेम, पण शेतकऱ्यांचं आयुष्य काळ्याकुट्ट?
दरवेळी हत्तीच्या उपस्थितीला ‘निसर्गाचा भाग’ म्हणून सोयीस्कर स्पष्टीकरण देणारे काही प्राणी प्रेमी आणि तथाकथित कार्यकर्ते हे हत्तीच्या हालचालींना दाद देतात, पण शेतकऱ्यांच्या रोजीरोटीचा सवाल मात्र दुर्लक्षित करतात, अशी ग्रामस्थांची तीव्र नाराजी आहे.
“ओंकार हत्तीने आता पाळीव प्राण्याचा दुसरा बळी घेतला; यात शेतकरी अपराधी आहे का?” असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.
घटनेनंतर हत्तीने परिसरातील केळीची झाडे उध्वस्त केली. रात्रीभर कळणे—देऊळवाडी परिसरात त्याची ये-जा सुरू होती.
गेल्या सव्वा दोन महिन्यांपासून सावंतवाडी–गोवा मार्गावर फिरणाऱ्या ओंकार हत्तीवर वनविभागाचा नियंत्रण नसल्याने नागरिकात भीतीचे सावट अधिक गडद झाले आहे.
सकाळी वनअधिकारी आले, पाहणी केली, पंचनामा केला. पण हत्ती याच भागात पुन्हा येणार नाही याची हमी देणारी एकही ठोस हालचाल नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ओंकार हत्ती आता भिकेकोंाळ दिशेने गेल्याचे सांगितले जात आहे, पण त्याच्या अनिश्चित फेरफटक्यांमुळे कळणे परिसर दहशतीच्या छायेत आहे. “शेतकऱ्यांचा जीव, जनावरे, शेती… याची जबाबदारी घेणार कोण?” असा ग्रामस्थांचा एकच प्रश्न आहे.
