*विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्याची गरज*- सज्जनकाका रावराणे.
वैभववाडी
आजच्या विज्ञान-तंत्रज्ञान युगात वावरत असलो तरी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्याची गरज आहे असे आवाहन सज्जनकाका रावराणे यांनी केले.
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभाग व इन्कूबेशन सेल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान(PM–USHA) अंतर्गत विज्ञानातील नाविन्यपूर्ण आणि अद्भुत प्रयोगांची प्रात्यक्षिके कार्यक्रम मंगळवार दि. ९ डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला.
विज्ञानाची गोडी, प्रयोगशीलता आणि विद्यार्थ्यांमध्ये शोधक वृत्ती निर्माण करण्याचा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.सज्जनकाका रावराणे, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. भगवान चक्रदेव तसेच महाराणा प्रतापसिंह संस्थेचे विश्वस्त श्री.शरदचंद्र रावराणे हे व्यासपीठावर उपस्थित होते. वैभववाडी तालुक्यातील विविध माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. विज्ञान विषयाला प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून अनुभवण्याची संधी मिळत असल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सहभाग उल्लेखनीय होता.
भौतिकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एम. ए. चौगुले यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा, उद्देश आणि हेतू स्पष्ट केला. डॉ. भगवान चक्रदेव सर यांच्या नाविन्यपूर्ण आणि आकर्षक, अद्भुत विज्ञानप्रयोगांच्या सादरीकरणाने विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुतूहलाची ठिणगी प्रज्वलित झाली, विज्ञानाविषयीची जिज्ञासा वाढली.
कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगतात श्री.सज्जनकाका रावराणे यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्याची गरज अधोरेखित केली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा विचार सुसूत्र होतो, त्यांची जाणीव विस्तृत होते तसेच भविष्यातील संशोधनाचा पाया मजबूत होतो असे सांगितले. नवीन शोधांची सुरुवात नेहमी एका प्रश्नातून होते. विद्यार्थी विचार करतो, निरीक्षण करतो आणि त्यातून संकल्पना जन्म घेते असे विश्वस्त श्री.शरदचंद्र रावराणे यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी, उपप्राचार्य डॉ. एम. आय. कुंभार आणि PM–USHA समन्वयक डॉ. के. पी. पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तसेच आभारप्रदर्शन प्रा. निलेश कारेकर यांनी केले.
