You are currently viewing मच्छिमार महिलांच्या संरक्षणासाठी सरकारचा पुढाकार; कोळंबी सोलण्यासाठी विशेष ग्लोव्हज वाटपाचा निर्णय

मच्छिमार महिलांच्या संरक्षणासाठी सरकारचा पुढाकार; कोळंबी सोलण्यासाठी विशेष ग्लोव्हज वाटपाचा निर्णय

मासळी बाजारातील दुर्गंधी-स्वच्छता सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना सुरू; स्थलांतरित बाजारासाठीही सकारात्मक चर्चा — मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

 

नागपूर :

कोळंबी सोलताना मच्छिमार महिलांच्या बोटांना होणाऱ्या वेदना, जखमा आणि बाजारातील अस्वच्छतेचा प्रश्न अखेर शासनाच्या पातळीवर ऐरणीवर आला आहे. विधानपरिषदेत लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मच्छिमार महिलांसाठी विशेष संरक्षणात्मक हातमोजे उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. ‘मेक इन इंडिया’ आणि उच्च दर्जाचे परदेशी ग्लोव्हज मागवून ते लवकरच महिलांना वितरित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यामुळे महिलांना होणारा हातांचा त्रास कमी होईल आणि कोळंबी सोलण्याचे काम अधिक सुरक्षित व सुलभ बनेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मासळी बाजारातील दुर्गंधी आणि अस्वच्छता दूर करण्यासाठी विभागामार्फत आधीच उपाययोजना सुरू असल्याची माहितीही राणे यांनी दिली. भाजप आमदार उमा खापरे यांच्यासोबत याबाबत स्वतंत्र बैठक घेऊन सविस्तर माहिती दिली जाणार आहे, असे त्यांनी आश्वासन दिले.

स्थलांतरणाच्या मुद्द्यावरही सकारात्मक तोडगा

क्रॉफर्ड मार्केटमधील मासळी विक्रेत्यांना महात्मा जोतिबा फुले मंडई येथे स्थलांतरित करण्याच्या मुद्द्यावरही मंत्री राणे यांनी भूमिका स्पष्ट केली. मुंबई पालिका आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत पुनर्विकास आराखडा मच्छिमारांना दाखवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

विक्रेत्यांनी अंडरग्राउंड जागेबाबत घेतलेल्या आक्षेपांची नोंद घेऊन, तात्पुरती व्यवस्था करण्याचे आणि नंतर वरच्या मजल्यावर उत्तम सुविधा देण्याचे सकारात्मक आश्वासन देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा