तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाची धडक मोहीम; वेत्ये–सोनुर्ली व कोलगाव तिठा परिसरात रात्री उशिरा कारवाई
सावंतवाडी :
सावंतवाडी तहसील कार्यालयाच्या भरारी पथकाने रविवारी रात्री अवैध वाळू तस्करीवर मोठी शिक्कामोर्तब कारवाई करत तब्बल सहा डंपर जप्त केले. ही कारवाई रात्री उशिरा वेत्ये–सोनुर्ली मार्गासह कोलगाव तिठा परिसरात करण्यात आली.
दिनांक ७ डिसेंबर रोजी रात्री ११.३० च्या सुमारास गस्तीदरम्यान भरारी पथकाला खरोबा देवस्थानाजवळील मोकळ्या जागेत पाच डंपर संशयास्पदरीत्या उभे असल्याचे आढळले. त्वरित कारवाई करून पथकाने ही सर्व वाहने ताब्यात घेतली. पुढील गस्तीदरम्यान कोलगाव तिठा येथे आणखी एक डंपर अवैध वाळू वाहतूक करताना पकडला, अशी माहिती महसूल विभागाने दिली.
ही यशस्वी मोहीम तहसीलदार व भरारी पथक प्रमुख श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वात पार पडली. पथकात ग्राम महसुल अधिकारी व महसुल सेवकांचा समावेश होता.
महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध वाळू वाहतूकदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

