*निखळ मनोरंजनासह सांस्कृतिक प्रबोधन करणाऱ्या नमस्कार महोत्सवाचा उत्साहात समारोप*
पिंपरी
निखळ मनोरंजनासह समाजाचे आरोग्य संवर्धन आणि सांस्कृतिक प्रबोधन करणाऱ्या नमस्कार फाउंडेशन आयोजित पाच दिवसीय नमस्कार महोत्सवाचा समारोप रविवार, दिनांक ०७ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहात करण्यात आला. निगडी प्राधिकरणातील नियोजित महापौर निवास मैदानावर आयोजित केलेल्या या महोत्सवात विविध प्रकारचा विनामूल्य आरोग्य सल्ला आणि सुविधांचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला. महोत्सवात रविवारी सादर करण्यात आलेल्या ‘हीच खरी फॅमिलीची गंमत आहे!’ या धमाल नि:शुल्क विनोदी नाटकाला थंडीचा कडाका असूनही रसिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली होती. एस. पी. क्रिएशन्स निर्मित आणि नवनीत प्रकाशित ‘हीच खरी
फॅमिलीची गंमत आहे!’ या संतोष पवार लिखित आणि दिग्दर्शित नाटकात विसरभोळा बाप, ढालगज आई आणि त्यांची दिवसा आंधळेपणाचा दोष असलेली वयात आलेली सुंदर मुलगी असलेले कुटुंब आणि त्यांच्या शेजारी स्मार्ट बायको तिचा कर्णबधिर नवरा, एक अडखळत बोलणारा आणि दुसरा रातांधळा असलेला असे दोन दीर असे दुसरे कुटुंब यांच्यातील धमाल जुगलबंदी पाहताना प्रेक्षकांची हसून पुरेवाट झाली. सागर कारंडे, शलाका पवार, प्रतीक पाध्ये, हर्षदा कर्वे, विनिषा कुलकर्णी, राकेश शालिनी आणि संतोष पवार या कलाकारांच्या अप्रतिम अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
नाट्यप्रयोगापूर्वी, सामाजिक कार्यकर्ते सलीम शिकलगार, सरिता साने, विजया जोशी आणि नमस्कार फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवात योगदान देणाऱ्या व्यक्तींना स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. ज्योती कानेटकर यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

