*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम लेख*
*“आरसा,बांगडी,टिकली आणि तिचं मन”*
*’आरसा*’ आणि तिचं नातं म्हणजे जगावेगळंच,अर्मयादीत,विचारा पलीकडच.म्हटलं तर ती आरशा शिवाय नाही आणि आरसा तिच्याशिवाय नाही.अस काही आरशाच आणि तिचं घट्ट नातं असतं
म्हणजे स्त्रीच्या सौंदर्यापलीकडचा, तिच्या भावनांचा,तिच्या प्रेमाचा आणि आत्मविश्वासाचा सजीव प्रवास आरशात दिसतं.आरसा,बांगडी, टिकली,प्रेम,सौंदर्य आणि तिच्या अंतरमनाचा संगम आरसा दाखवतो. कारण आरसा,तिच्या बांगड्या,तिची टिकली यांना तिच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे.हे जरी बाहेरून केवळ अलंकार वाटत असलं तरी,तिच्या अंतरमनात त्या विषयी एक आदर्श भाव असतो त्यांच्यामुळे तिचं सौंदर्य खुलतं.म्हणून तिच्या मनाचा,तिच्या भावनांचा तिच्या प्रेमाचा आणि तिच्या सौंदर्याचा जवळचा सोबती जर कोणी असेल तर तो म्हणजे आरसा.रोज सकाळी ती आरशासमोर उभी राहते. हातात कंगवा,डोळ्यांत स्वप्नं ओठांवर थोडंसं हसू.असं काही अंतर्मुख करणारा भाव आरशात बघताना ती फक्त चेहरा पाहत नाही तर ती स्वतःला न्याहाळते,लाजते आरशाशी बोलते, क्षणभर स्वतःला बघताना तिला तिचं मन कधीच थकलेलं जाणवतं. जरी ती थकलेली असली तरी.कधी आनंदात असते.कधी उदास दिसते.कधी कधी नैराश्य असतं हे सर्व आरसा रोज बघत असतो म्हणून एकप्रकारे तिच्या चेहऱ्यावरच्या प्रतिकात्मक छटेचा प्रत्येक भावनेचा साक्षीदार आरसा असतो.ती आरशाशी बोलते,किंबहुना आरशासोबत तिच मैत्रीपूर्ण नातं असतं.आरसा अणि तिचे भावनिक संबंध असल्यामुळे ती मनातल्या मनात त्याच्याशी संवाद साधत असते.मग आरसा ही तिच्याकडे निरखून बघतो त्याला तिच्या चेहऱ्यावरचा थकवा दिसतो तिच्या चेहऱ्यावर नैराश्य जाणवतं.तिच आरशाकडे एकसारख पाहणं,स्वतःचं निरीक्षण करणं सारेकाही आरशाला कळत असलं तरी आरसा काही बोलत नाही,पण आरशासमोर उभं राहून त्याच्यात स्वतःला बघताना तिला तिचं उत्तरं सापडतं त्याच्यासमोर उभी राहून ती स्वतःकडे पाहते,आणि प्रत्येक वेळी थोडी अधिक मजबूत होते.काहीका असेना आरशात पाहिल्यावर एक समाधानाचा गारवा तिच्या अंतर्मनाला स्पर्श केल्यावर तिच्या गालावर मात्र हसु फुलतं.
*’बांगडी’* तिच मनगट काही सोडतं नाही घट्ट मिठी मारून वेगवेगळ्या सुरात तिच्याशी संवाद साधते.ती ही त्या नादमय बांगड्याना गोंजारते जणूकाही हळव्या प्रेमाचा कोमल स्पर्श त्या बांगड्यानां होतो म्हणूनचं स्वयंपाक घरात पाऊल टाकताच बांगड्या किणकिणतात बांगडीला तिचं अंतरमन कळतं तिच्या हातातल्या बांगड्या तिच्या भावना ओळखतात कधी त्यांचा नाद आनंदाचा असतो,कधी शांततेचा,तर कधी काळजीचा.ती काम करताना जेवण वाढताना किंवा त्याच्या हातात चहा देताना बांगड्यांचा आवाज प्रेमाची भाषा बोलतो.आरशाशिवाय जसं सौंदर्य बघता येत नाही अगदी तसंच बांगडीशिवाय हात ही सुंदर दिसत नाही.स्त्री सौंदर्याचं परिपूर्ण सत्व त्या छोट्याश्या बांगडीत आहे म्हणूनचं प्रत्येक स्त्री बांगडीला प्रेमाने जपते.ती बांगडीशी मनातच बोलते, “आज उशिरा येईल म्हणे तो… जेवण थोडं गरम ठेवू का?”त्या बांगड्या किणकिणत सांगतात,“तुझ्या प्रेमातच त्याची भूक भागते,चिंता करू नकोस. तो आला की तुझा आणि त्याचाही सर्व थकवा जाईल.तो आला की मग ती त्याच्यासाठी चहा बनवते पण त्या कपात चहा नसतो तर त्यात तिचं प्रेम काळजी आणि मायेचा उबदार सुगंध असतो.तो चहा घेतो तेव्हा ती त्याच्या चेहऱ्यावरच हसू पहाते आणि मनात म्हणते बास्स याच हसण्यात माझं विश्व सामावलेलं आहे.मग निवांत वेळी ती पुन्हा आरशासमोर उभी रहाते.दिवसभराचा थकवा असुनही तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज असतं कारण प्रेमात जगायचं म्हटल्यावर रोजच्या छोट्या छोट्या क्षणांना जपायच असतं.म्हणून शक्यतोवर ती बांगडी फुटणार नाही याची जास्त काळजी घेते आणि बांगडी टिचलीच तर ती तिच्या हातावर जखम करतं नाही एव्हढ प्रेम बांगडीचही तिच्यावर असतं.
*’टिकली’* छोटीशी असते हो! पण कपाळावर काय तिचा रूबाब असतो.एक छोट्याश्या टिकलीमुळे चेहरा तिचा देखणा दिसतो.आगळ वेगळ रूप चेहऱ्यावर दिसायला लागतं टिकली म्हणजे केवळ प्रेमाचा लाल ठिपका नसून तिच्यासाठी तिच्या सौंदर्याच,सौभाग्याच प्रेमाचं अभिमानाच प्रतीक असतं.जणूकाही ती कपाळावर टिकली लावताना तिचं मन हळुवार स्पर्शाने उजळतं.टिकली केवळ शोभा नाही,तर तिच्या नात्याचा विश्वास असतो.एक बंध,एक वचन एक निखळ नाते या छोट्याशा टिकलीमुळे घट्ट होत.ती जेव्हा कपाळावर टिकली लावते तेव्हा ती मनात म्हणते,“ही फक्त लाल ठिपकी नाही,तर ही माझ्या आयुष्याची खूण आहे.”तिच्या त्या टिकलीत तिचा नवरा,तिचं घर,तिचं अस्तित्व साठलेलं असतं.ती प्रेम व्यक्त करत नाही तर ती प्रेम जगते.ती स्वतः मायेचं,प्रेमाचं आणि आत्मविश्वासाचं मूर्तिमंत रूप म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.ती फक्त नवऱ्याची काळजी करणारी बायको नाही तर एक सहचारिणी अर्धांगिनी मैत्रीण म्हणून तिचा त्याच्या आयुष्यात वावर असतो तिच्या हातातलं प्रेम आणि तिच्या डोळ्यांतील भावनिकता तिच्या ताकदीची ओळख देते.टिकली दोघांचं नातं घट्ट करते म्हणून एकमेकांना एकमेकांचा आधार असतो.आदर असतो,काळजी,जिव्हाळा,सन्मान आपलेपणा असं बरंच काही असतं म्हणून टिकली शिवाय ती राहूच शकत नाही.टिकली एकार्थी तिचं सौभाग्याचं लेण असतं म्हणून ती कपाळ कोरे ठेवत नाही.कारण टिकली मुळे ती खूप सुंदर दिसते.ती जेव्हा स्वतःला आरशात न्याहाळताना तिचं सौंदर्य पाहते ना तेंव्हा ती म्हणते, “मी आहे ना…”, हे फक्त तिचं विधान नसतं तर त्याच्यासाठी ती एक हमी असते.त्या शब्दांत तिच्या घराचं, अस्तित्व,तिच्या नवऱ्याचं सुख,आणि तिच्या आयुष्याचं स्थैर्य दडलेलं असतं.
तिचं जग म्हणजे प्रेमाचं आरसपानी प्रतिबिंब ती आरशाशी बोलते, बांगड्यांशी हसते,टिकलीला न्याहाळते आणि स्वतःशी संवाद साधते.या सगळ्यात तिचं मन कधी दुखतं,कधी उमलतं,कधी फुलतं कधी कधी गहिवरून येतं पण कधी थकत नाही.कारण तिला माहीत असतं की प्रत्येक दिवस,प्रत्येक क्षण,तिच्या प्रेमात,तिच्या काळजीत आणि तिच्या शांततेत तो सामावलेला असतो तिचं जग छोटं असलं तरी ते अमर्यादित आहे कारण त्या जगात आरसा आहे, बांगडी आहे, टिकली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यासह ती स्वतः आहे.तिच जगणं हे फक्त त्यांच्यासाठी असतं.ती दिवसभर राबते,थकते पण तो जेव्हा थकून भागून येतो तेव्हा ती तिच्या चेहऱ्यावरचा थकवा दाखवत नाही.थकवा दिसून नये म्हणून ती आरशात बघताना थकवा पुसून घेते.
ती दिवसभरात दमलेली असली तरी तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज असतं.कारण तिचं जगणं म्हणजे त्याच्यासाठी अर्थात नवऱ्या साठी असतं म्हणून ती त्याला एकटं पडू देत नाही कदाचीत तो नसला तरी ती त्याच्या सोबत असते त्याच्या पाठीशी असते ती टिकली नीट लावते,केसात गजरा माळते,आणि आरसा न्याहाळता तो मागून येतो मिठी मारतो.त्यालाही तिचं मन वाचता येत,दोघांच्याही प्रेमाचा भावनिक गुंता एकमेकांच्या हृदयाशी जोडलेला असतो म्हणून त्यालाही तिच्या चेहऱ्यावरचे भाव कळतात म्हणून तिला अलगद कवेत घेताना
आज तू खरच खूप सुंदर दिसतेस असं लाडीकपणे म्हणतो.त्या दोघांच खरं प्रेम पाहून आरसा हलकं हसतो,टिकली उजळते बांगडी खणखणते.मग ते दोघं एकत्र बसतात दिवसभरातल्या घडामोडी एकमेकांना सांगतात छोट्या छोट्या गोष्टी शेअर करतात.तो विचारतो,“आज दमलीस ना?”ती म्हणते, “तू आहेस ना,मग काय,तू असल्यावर सगळा थकवा नाहीसा होतो.”त्या क्षणी शब्द थांबतात,फक्त नजरा बोलतात.ते नातं खूप तळमळीच असतं त्यात रोजचा प्रेमाचा स्पर्श,काळजीचं मृदू वलय आणि शृंगाराचा हलका गुलाबी रंग असतो.कारण आरसा बांगडी टिकली आणि तिचं अंतरमन आरशासारख चकचकीत असतं.तेव्हा आरसा घरात नाही असं एकही घर जगात कुठेही सापडणार प्रत्येकाच्या घरात आरसा असतो. अरशामुळे घरही सुंदर दिसतं आणि मनही.तिच्या सौंदर्याची परिभाषा म्हणजेच आरसा.आणि टिकली बांगडीमुळे तिच्या सौंदर्याला पुर्णत्व येते.म्हणून आरसा तिला एकटं पडू देत नाही.आरसा तिला तिचं खरं रूप दाखवतो.
*(संजय धनगव्हाळ)*
*(अर्थात कुसुमाई)*
९५७९११३५४७
९४२२८९२६१८

