*ग्राहक संरक्षण कायदा सहज, सुलभ आणि ग्राहकाभिमुख होण्यासाठी शिफारशी देणार*
ॲड. शिरीष देशपांडे
वैभववाडी
नवीन ग्राहक संरक्षण कायदा सहज, सुलभ आणि ग्राहकाभिमुख होण्यासाठी शिफारशी देणार असल्याची माहिती मुंबई ग्राहक पंचायतचे कार्याध्यक्ष अॅड. शिरीष देशपांडे यांनी व्यक्त केली.
मुंबई येथील ग्राहक सदन येथे दि. ६ डिसेंबर रोजी ‘अखिल भारतीय ग्राहक पंचायत’, ‘ग्राहक पंचायत महाराष्ट्र‘ आणि ‘मुंबई ग्राहक पंचायत‘ संस्थेचे पदाधिकारी यांची बैठक मुंबई ग्राहक पंचायतचे कार्याध्यक्ष ॲड. शिरीष देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीत १) ग्राहक संरक्षण कायदा निर्मिती, उद्देश आणि जडणघडणीतील ग्राहक पंचायतींचे योगदान
२) ग्राहक कायद्याची अंमलबजावणी- ग्राहक न्यायालये आणि ग्राहक संरक्षण परिषदा- सद्यस्थिती
३) ग्राहक संरक्षण कायदा दुरुस्ती- शिफारशी
या महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊन ग्राहक संरक्षण कायद्याची सहज, सोप्या आणि कमी वेळेत अंमलबजावणी व्हावी यासाठी शासनाला आवश्यक सुधारणा आणि शिफारशी करण्याचे ठरले.
ग्राहकांचे सार्वजनिक स्वरूपाचे प्रश्न तातडीने निकाली निघण्यासाठी ग्राहक संरक्षण परिषद अधिक कार्यक्षम करावी यासाठी मसुदा तयार करून शासनाला सादर करण्याचे या बैठकीत ठरले.
महाराष्ट्रातील अ.भा. ग्राहक पंचायत, मुंबई ग्राहक पंचायत आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र या तीन संस्था ग्राहक संरक्षण कायद्याच्या ग्राहकाभिमुख अणि जलद कार्यवाहीसाठी एकत्र येऊन लढा देतील, ही क्रांतिकारी घटना ग्राहक चळवळीसाठी मोठी आणि यशस्वी भरारी घेणारी सिद्ध होईल असा आशावाद ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी व्यक्त केला.
या महत्वपूर्ण बैठकीत
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सुर्यकांत पाठक, विजय सागर, श्रीमती वीणा दीक्षित व राजेंद्र बंडगर, ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय लाड, सचिव अरुण वाघमारे व ॲड सुरेंद्र सोनावणे तर मुंबई ग्राहक पंचायतचे डॉ. अर्चना सबनीस, ॲड. पूजा जोशी देशपांडे, श्रीम. अनिता खानोलकर, श्रीम. अनुराधा देशपांडे व श्रीम. शर्मिला रानडे उपस्थित होते. शेवटी सौ. अनुराधा देशपांडे यांनी सर्वांचे आभार प्रदर्शन केले.

