You are currently viewing कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील साहित्यिकांचे संमेलन लवकरच; संमेलनासाठी सर्वतोपरी मदत करू: रणजीत देसाई
Oplus_16908288

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील साहित्यिकांचे संमेलन लवकरच; संमेलनासाठी सर्वतोपरी मदत करू: रणजीत देसाई

*कोमसाप सिंधुदुर्ग, शाखा कुडाळ आयोजित भाकरी आणि फुल कवी संमेलन व कार्यकर्ता मेळावा संपन्न*

कुडाळ:

कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग साहित्यिक चळवळ जोमाने पुढे नेत असून नवनवीन साहित्यिक घडविण्याचे कार्य अशा संमेलनाच्या माध्यमातून घडत आहे, असे गौरवोद्गार संमेलनाचे उद्घाटक श्री रणजीत देसाई यांनी काढले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 100 हून अधिक साहित्यिक घडले असून ज्या साहित्यिकांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत अशा साहित्यिकांचे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून साहित्यिक संमेलन येत्या जानेवारी महिन्यात आयोजित करणार असून राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री आशिष शेलार व जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यासाठी उपस्थित राहणार आहेत.

कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्गने आयोजनाची योग्य तयारी करावी, या साहित्यिक संमेलनाची सर्वतोपरी जबाबदारी आम्ही स्वीकारू. जिल्ह्यात अशाप्रकारचे हे पहिलेच लेखक कवी साहित्यिक संमेलन भरविले जाईल, असे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे उद्घाटक रणजीत देसाई यांनी स्पष्ट केले.

कुडाळ येथील श्री संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या सभागृहात कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग व कुडाळ शाखेच्या संयुक्त विद्यमाने कोमसाप कार्यकर्ता मेळावा तसेच “भाकरी आणि फुल” जिल्हास्तरीय कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्घाटक तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री रणजित देसाई यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, साहित्यिकांचे विचार सर्वप्रथम शालेय मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांनी कोकण मराठी साहित्य परिषदे सोबत संयुक्त उपक्रम राबवून मुलांमध्ये साहित्यिक विचार रुजविण्यासाठी एकत्रित काम केले पाहिजे. यासाठी तशा प्रकारच्या सूचना आपण जिल्हा परिषद शिक्षण विभागाला करणार आहे. यावेळी त्यांनी कोमसापच्या साहित्यिकांचा कार्यकर्ता मेळावा व भाकरी आणि फुल हे कवी संमेलन एकत्रित आयोजित केल्याबद्दल त्यांनी कोमसाप जिल्हा व कुडाळ शाखेचे विशेष कौतुक केले.

सदर उद्घाटनपर कार्यक्रमाच्या दरम्यान कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग कडून विविध पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यात प्रामुख्याने कोमसापचा राजधानी पुरस्कार प्राप्त मालवणी कवी रुजारियो पिंटो, बीज अंकुरे अंकुरेच्या संपादनासाठी मालवण शाखाध्यक्ष श्री सुरेश ठाकूर, मालवणच्या लेखिका वैशाली पंडित, कादंबरीकार वृंदा कांबळी, ना. बा. रणसिंग, कोमसाप प्रांत विभागाचे समन्वयक अनंत वैद्य, कोमसापच्या बांधकाम समितीचे सदस्य श्री संदीप वालावलकर आदींचा समावेश आहे.

सत्काराला प्रातिनिधिक उत्तर देताना श्री अनंत वैद्य यांनी कोमसापने भविष्यात वाटचाल करताना साहित्याच्या जोडीला शालेय स्तरावर मुलांमध्ये अलीकडे वाढत चाललेली मोबाईलची आवड कमी करून साहित्याकडे त्यांचा कल रहावा यासाठी तरुण पिढी आणि शालेय विद्यार्थी यांना केंद्रबिंदू ठेवून शाळांबरोबर संयुक्त उपक्रम राबवावेत जेणेकरून नवी पिढी वेगळ्या धर्तीवर तयार होईल अशी सूचना केली.

यावेळी कोमसाप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री मंगेश मसके यांनी कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्गच्या कार्याचा आढावा घेतला व कोकण मराठी साहित्य परिषद कोकणात साहित्यिक चळवळ पुढे नेत असून कार्यकर्ता मेळावा व कवी संमेलनाच्या माध्यमातून नवनवीन साहित्यिक घडविण्याचे, त्यांना व्यासपीठ देण्याचे कार्य करत असल्याचे सांगितले.

कोमसाप आयोजित भाकरी आणि फुल कवी संमेलनाच्या अध्यक्ष स्थानी कवी रुजारियो पिंटो होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुडाळ शाखाध्यक्ष प्राध्यापक संतोष वालावलकर यांनी केले तर आभार जिल्हा सहसचिव सुरेश पवार यांनी मानले. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन सौ स्नेहल फणसळकर यांनी केले आणि आभार तालुका सहसचिव संदीप साळसकर यांनी मानले.

*या कवींनी आणली कवी संमेलनात रंगत*

“कुडाळ शाखा व कोमसाप सिंधुदुर्ग आयोजित “भाकरी आणि फुल” कवी संमेलनात कवी विठ्ठल कदम, रामदास पारकर, प्रज्ञा मातोंडकर, ॲड.नकुल पार्सेकर, ऋतुजा सावंत भोसले, सावंतवाडी शाखाध्यक्ष दीपक पटेकर, मधुरा वझे, श्रावणी प्रभू, अर्चना जोशी, राजस रेगे, मंगेश बागवे, सानिका पालव, वैशाली पंडित, भरत ठाकूर, सुरेश पवार, स्वाती सावंत, साईप्रसाद वेंगुर्लेकर, गोविंद पवार, राजेंद्र गोसावी, प्रगती पाताडे, मनोहर सरमळकर, सुष्मिता राणे, स्नेहल फणसळकर या कवींनी आपल्या सुरेल काव्यातून रंग भरले.

प्रतिक्रिया व्यक्त करा