दोडामार्ग परिसरामध्ये चोरट्यांचा कहर
CCTV मध्ये हेल्मेटधारी संशयिताची हालचाल कैद
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यात गेल्या रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत सलग चार ठिकाणी चोरी केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. दोडामार्ग ते साटेली-भेडशी या परिसरात घडलेल्या या मालिकात्मक चोर्याामुळे व्यापारी तसेच नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.
दोडामार्ग बाजारपेठेतील एका चिकन सेंटरसह शेजारील दुसऱ्या दुकानाचे कुलूप तोडून रोकड व विविध साहित्य लंपास करण्यात आले. तसेच आंबेली येथील एका गॅरेजमध्ये चोरी झाली, तर साटेली-भेडशी येथे एका सुपर मार्केटलाही चोरट्यांनी लक्ष्य केले.
यापैकी दोडामार्गमधील एका दुकानाच्या CCTV कॅमेऱ्यात एक संशयित चोरटा स्पष्टपणे दिसून आला. त्याने हेल्मेट तसेच लाल रंगाचा टी-शर्ट घातलेला असून त्याचा चेहरा झाकलेला असल्याने ओळख पटवणे कठीण ठरत आहे.
सतत वाढत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांनी पोलिसांनी गस्त वाढवून आरोपींचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी केली आहे.
