*मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानचे सन्मा.सदस्य ज्येष्ठ कवी लेखक दुर्गाप्रसाद खांडाळेकर लिखित अप्रतिम कथा*
भोपळ्याची किमया
एका परदेशी कंपनीत मोठ्या पदावर असलेला वसंत रेगे गिरगावात ” मामाच्या वाडीत” रहात होता. जागा लहान पडतअसल्याने तो जागेच्या शोधात होता.बर्याच जागा पाहिल्यावर व गिरगावच्या जागेला चांगली किमत देणारा ग्राहक मिळाल्याने त्याने बोरिवलीच्या मध्यवर्ती भागातील नूतन नगर मध्ये चार खोल्यांचा प्रशस्त फ्लँट खरेदी केला.गार्डन करण्यासाठी तेथे छोट्या टेरेसची सोय होती.
पाडव्याच्या सुमुर्हतावर वसंत आपली पत्नी लता,आई
सुमती बाई व पाच वर्षांचा छोटा सोहम या सर्वांसह बोरिवलीच्या नव्या जागेत रहायला आला. जागा नवी असल्याने सुरवातीचा वेळ नव्याच्या नवलाईत व शेजारपाजार्यांच्या ओळखी करण्यात गेला. सोसायटीतील
सर्वच लोक सुशिक्षित असल्याने स्वछता, सुरक्षितता वगैरे सर्व नियमांचे पालन केले जाई. इमारतीच्या कंपाउंडमधे
असलेल्या जागेत बिल्डरने एक बाग करून दिल्याने सोसायटीच्या सौंदर्यात भरच पडली होती व पर्यावरणाचे
रक्षण देखील होत असे.
एकंदरीत सर्व काही सुखात व सुरळीत चालू होते तरी लता मात्र मनापासून खूश दिसत नव्हती. या सोसायटी मधे
आपल्याला कोणी विचारात नाही अशी तीची भावना झाली होती. तीच्या शेजारच्या भावे काकींची मुलगी स्मिता ” ख ” वाहिनीच्या कुठल्याशा टुकार मालिकेमधे नायिकेच्या मैत्रीणीचा रोल करत होती त्या जोरावर आपणच मालिकेची नायिका असल्याच्या थाटात भावेकाकी भाव खात होत्या. दुसरी शेजारीण पिंकी अरोरा माँडेलिंग करत असल्याने तिचा तोरा तर औरच होता. थोड्याच दिवसात आपण हिंदी चित्रपटात नायिका होणार एवढेच सांगण्याचे तिने बाकी
ठेवले होते.
या पार्श्वभूमीवर लताजवळ तिचे महत्त्व वाढेल अशी कोणतीच खास गोष्ट नसल्याने ती थोडी दुर्लक्षीत झाली होती. ते पूर्वी रहात असलेल्य गिरगावातील परिस्थिती याच्या अगदीच विरुद्ध होती. येथे ” मामाच्या वाडीतील गणेशोत्सव,सत्यनारायण पूजा वगैरे सर्व सार्वजनिक कार्यक्रमात “लतावहिनींच्या” मताला किंमत होती. तिच्या सहमतीनेच सर्व कामे होत होती पण या नूतन नगर मधे मात्र तिला फारसे कोणी विचारत नव्हते.त्यामुळे काय केले म्हणजे आपले येथील महत्त्व कसे वाढेल याच विचारात लता असे.
त्याच दरम्यान महानगरपालिके तर्फे वर्तमानपत्रात आवाहन येते कि प्रत्येक सोसायटीने पालिकेच्या कर्मचाऱ्यांना कचरा देतांना ओला व सुका असा विभागून द्यावा.त्यानुसार सोसायटीचा सेक्रेटरी पंकज पटेल सर्व नूतन
नगर रहिवाशांना महापालिकेला सहकार्य करण्याबाबत पत्रक काढतो.काही रहिवाशी याला महापालिकेचे नवे खुळ
समजतात तर काही आता कामे वाढणार असा वैताग व्यक्त
करतात.
पालिकेचा हा आदेश वाचल्यावर लताच्या मनात टेरेस गार्डनचा विचार येतो कारण ओला कचरा पालिकेला न देता आपल्या गार्डन साठी त्याचा चांगला उपयोग होईल हे लताच्या लक्षात येते.हे आपल्याला आधीच सुचायला हवे होते असे तिला वाटून जाते.
आपल्या कल्पनेनुसार टेरेस गार्डन केल्यास आपला वेळही जाईल,हौस भागेल व या छंदापायी सोसायटी मधे जरा मिरवताही येईल हि गोष्ट लताच्या लक्षात येते. लगेचच दुसर्या दिवशी लता लहान मोठ्या काही कुंड्या, माती, खत, काही गुलाब वगैरे फुलझाडे गुपचुप आणते. व विश्वगुरु ” यु ट्युब “वरुन माहिती घेऊन आणलेल बी व फुलझाडे सूचनांनुसार वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये लावते तसेच घरातील ओला कचराबारीक करून कुंड्यांमध्ये टाकते.
थोड्याच दिवसात रोपे रुजतात व त्यावर रंगीबेरंगी
फुले येऊ लागतात.तशातच एका मोठ्या कुंडीत एक वेल रुजुन येतो. तो कसला वेल आहे हे लताला न समजल्याने लता वेलाला दोरा बांधून भिंतीवर चढविते.थोड्या दिवसात
वेलावर छानशी पिवळी फुले येऊ लागतात. तेव्हा लताला खूप आनंद होतो पण कसचे काय ! दोनच दिवसात फुले गळून पडतात लता निराश होते. काय करावे हे न कळल्याने लता बाँटनी शिकणारी आपली भाची प्राची हिला आपल्या घरी बोलावते. ओल्या कचर्यातून भोपळ्याचे बी कुंडीत पडून तेथे भोपळ्याचा वेल रुजला असावा असे लताला वाटते.
प्राची घरी आल्यावर लता तिला प्रथम टेरेस गार्डन दाखवते व नवीन आलेल्या वेला बद्दल सर्व सांगते. प्राची तो वेल पाहून तो भोपळ्याचाच असल्याचे सांगते व वेल भिंतीवर न चढवता जमिनीवर सोडण्यास सांगते व इतरही थोड्या सूचना करते.त्या सूचनांचे पालन केल्यावर वेलीवर
परत फुले येतात व त्यापासून फळे तयार होतात.त्यातीलही
दोन गळून जातात पण एक भोपळा मात्र हळूहळू वाढू लागतो.तेव्हा मात्र लताला खूप आनंद होतो.
आता हि खास बात उघड करण्याची वेळ आल्याचे
लताच्या लक्षात येते.प्रथम पतिराजाना हि बातमी देते.तेव्हा
वसंत लताचे खास अभिनंदन करतो.छोटा सोहम तर आईच्या बागेत “भोपळा” आल्याचे पाहून आनंदाने नाचत सुटतो व आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना घरी भोपळा पहाण्यासाठी बालावतो.सुमतीबाई देखील भोपळा पाहून खुश होतात व सूनेचे कौतुक करतात. पण ” सारख्या सूचना ” या ब्रीदानुसार भोपळा पिकल्यावर त्याचे घारगे करून शेजारी देण्यास सुचवितात. लताच्या सोसायटीमधील मैत्रिणी तिची बाग व बागेतील भोपळा पाहून खूप खुश होतात व लताचे अभिनंदन करतात.कारण वेलीवर नैसर्गिकपणे वाढलेला भोपळा या शहरातील मैत्रिणींनी पाहिलेलाच नसतो.
सोसायटीमध्ये राहाणारा व ” बातमी ” या दैनिकात काम करणारा वार्ताहर दिनू जगदाळे लताची मुलाखत घेऊन रविवार आवृत्तीत छायाचित्रासह छापून आणतो. दूरदर्शनच्या ‘ क्ष ‘ वाहिनीवरील ‘ मैत्रीण ‘ कार्यक्रमाच्या निर्मात्या आपल्या प्रतिनीधीला लता घरी पाठवून तीच्या टेरेस मधील बागेसह मुलाखतीचे चित्रण दाखवितात.
भोपळा पूर्ण वाढल्यावर सासूबाईंच्या सूचनेनुसार भोपळ्याचे घारगे करुन सोसायटीतील सर्व मैत़्रिणीना
दिल्यावर सर्वजण खूश होतात.
तो भोपळा पाहून लताला कोकणातले मामाचे घर आठवते व परसातल्या भाज्या मामीला देणारा मामा आठवतो व ती गहिवरुन येते. एका शेतकर्याच्या आनंदाची प्रचिती तीला या भोपळ्यामुळे मिळते. अशारीतीने शालेय जीवनात कधीही भोपळा न मिळालेल्या लताला हा बगिच्यातला भोपळा चांगलीच प्रसिद्धी व समाधान मिळवून देतो.
दुर्गाप्रसाद खांडाळेकर.
बोरिवली

