*प्रत्येक गोष्टीत विनोद दडलेला असतो! – प्रा. अजितकुमार कोष्टी*
*पाच दिवसीय नमस्कार महोत्सव*
पिंपरी
‘आजकाल माणसे हसायचे विसरली आहेत. खरं म्हणजे प्रत्येक गोष्टीत विनोद दडलेला असतो; परंतु तो शोधण्याची नजर मात्र आपल्याकडे हवी!’ असे विचार सुप्रसिद्ध एकपात्री हास्यकलाकार प्रा. अजितकुमार कोष्टी यांनी नियोजित महापौर निवासस्थान मैदान, निगडी प्राधिकरण येथे शनिवार, दिनांक ०६ डिसेंबर २०२५ रोजी व्यक्त केले. नमस्कार फाउंडेशन आयोजित पाच दिवसीय नमस्कार महोत्सवात ‘हसवणूक’ हा हास्यविनोदाचा बहारदार कार्यक्रम सादर करीत असताना प्रा. अजितकुमार कोष्टी बोलत होते. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राहुल कलाटे, सलीम शिकलगार, अतुल भोंडवे, विजया जोशी आणि नमस्कार फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. अजितकुमार कोष्टी यांनी गण्या या काल्पनिक पात्राच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक विसंगती नमूद करून श्रोत्यांना खळखळून हसवले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमापूर्वी, ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव यांनी नमस्कार फाउंडेशनचे संस्थापक – अध्यक्ष सुहास जोशी यांच्याशी प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून सुसंवाद साधून त्यांची वाटचाल श्रोत्यांसमोर उलगडून दाखवली. सुहास जोशी म्हणाले की, ‘हिंदी आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण झाल्यामुळे मला अस्खलित मराठी बोलता येत नव्हते. एकदा योगायोगाने मी प्रशांत दामले यांनी अभिनय केलेले नाटक पाहिले. त्यातील दामले यांचा अभिनय पाहून मी इतका प्रभावित झालो की, तेव्हापासून मराठी भाषा आणि मराठी नाटकांच्या प्रेमात पडलो. मराठी कलाकारांना मानसन्मान मिळावा म्हणून २००३ मध्ये नमस्कार फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. ज्योतिष, आयुर्वेद या आपल्या संस्कृतीतील दोन महत्त्वपूर्ण गोष्टींचा प्रचार अन् प्रसार व्हावा म्हणून २००६ पासून नमस्कार महोत्सवाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले. कोविड काळात असाहाय्य, गोरगरीब आणि रुग्ण यांना ‘रोटी बँक’ या उपक्रमांतर्गत मोफत भोजन पुरविले. या मानवतावादी कार्यात आर्थिक मदतीपेक्षा आपला सक्रिय सहभाग हवा आहे!’ असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. माधुरी ओक यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
