*मोरगाव शाळेत हसत-खेळत संविधान जागर संवाद उपक्रम*
*बांदा*
संविधान संवाद समिती महाराष्ट्र आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हसत-खेळत संविधान जागर संवाद हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला. संविधान आणि आपण या विषयावर सत्र घेण्यात आले.
सत्रात प्रास्ताविकेतील समता, समानता, न्याय आणि बंधुता या मूल्यांची ओळख विद्यार्थ्यांना खेळ, गप्पा, गटचर्चा आणि संवाद यांच्या माध्यमातून करून देण्यात आली. ओळख सत्रात विद्यार्थ्यांना नाव , आईचे नाव, वडिलांचे नाव , आडनाव अशी समानतेची नवी ओळख सांगण्याची पद्धत समजावून देण्यात आली. मुलांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यानंतर नियमांचे महत्त्व या विषयावर गटचर्चा घेण्यात आली. असावा सुंदर समतेचा बंगला हे गीत, गोळ्यांचा खेळ तसेच पटांगणातील वाघ–शेळी या खेळांच्या माध्यमातून समता, न्याय आणि बंधुता ही मूल्ये मुलांना आनंददायी पद्धतीने समजावून सांगण्यात आली.
सत्रात विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग दिसून आला. विशेषतः इयत्ता दुसरीतील आरोही आणि तन्मय या दोन विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवून उपस्थितांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संविधान संवादक अमोल रोहिणी दत्ताराम कदम यांनी केले.
या उपक्रमासाठी सहकार्य व परवानगी दिल्याबद्दल मुख्याध्यापक भाग्यश्री कुबल तसेच शिक्षकवृंद संतोष गवस, स्वाती पाटील, ज्ञानेश्वर सावंत आणि इतर कर्मचारी यांचे आभार मानण्यात आले.

