दोडामार्ग तालुक्यात पुन्हा गणेश हत्ती व सहकारी मादी दाखल…
बांबर्डे-घाटीवडे या ठिकाणी हजेरी
दोडामार्ग
चंदगड तालुक्यात गेले काही दिवस ठहरावलेले गणेश टस्कर व त्याची सहकारी मादी हत्ती दोडामार्ग तालुक्यातील बांबर्डे-घाटीवडे या भागात दाखल झाले आहेत. आज परिसरातील भागात फिरताना तेथील स्थानिक शेतकरी दत्ताराम देसाई यांना ते दिसले. यावेळी त्यांनी सुरक्षेच्या कारणामुळे त्या ठिकाणावरून पळ काढला. मात्र हत्तीची छबी त्यांनी मोबाईल मध्ये कैद केली आहे. हत्ती पुन्हा या ठिकाणी आल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
महिन्याभरापूर्वी हे हत्ती परत गेल्याने शेतीची कामे उरकून घेणाऱ्या शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र आता हत्तींच्या पुनरागमनाने परिसरात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोर्ले येथे एका शेतकऱ्याचा बळी घेणारा ओंकार हत्ती सध्या सावंतवाडी तालुक्यातील बांदा परिसरात आणि गोव्याच्या लगतच्या भागात धुमाकूळ घालत आहे. तिलारी खोऱ्यातील मूळ कळपातील तो स्वतंत्र झाला आहे. हत्ती पुन्हा आल्याने शेतीचे नुकसान होण्याची भीती असून वनविभागाने या हत्तींना वेळीच हाकलून लावावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.

