*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*बहिणाई…*
कशी उपजली बाई जयगांवी आसोद्यात
नाही शिकली तू शाळा कीर्त पसरे जगात
आभाळाचे पुस्तक नि मायमातीशी ग नातं
जगावेगळाच आहे लेवाबोलीचा तो पोत..
व्यवहाराचे गणित नाही कशाला भुलली
खात चटके चटके खूप शहाणी तू झाली
असंकसं तत्वज्ञान भले भले ग भुलले
सोपानाने लिहून ते फार उपकार केले..
न जाता शाळेत तू बघ विद्यावाचस्पती
तुला वाचता वाचता होते कुंठीत ग मती
जीवनाचं सार सारं विष पचविले बाई
खुरपता शेत माती बोल बोले बहिणाई..
पाने वाजविती टाया,झालो चकित ग आम्ही
माती उबदार वऱ्हे किती कल्पना ग नामी
वारा बोलतो कानात पान पान चावयते
निंदता खुरपता तू तो देवाला पाह्यते…
“अरे संसार संसार” किती बोलली तू खरे
कोन म्हणेल अडाणी जोतिषाला ठेवी पऱ्हे
सवताच्या बळावर तूच संसार खेचला
मानसाचा तो कानूस बरोबर तू वाचला…
तुझ्यासारखी “शहाणी” नाही पाहिली अजून
“आचंद्रसूर्य”सारे तुला वाचतील जन..
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
