*स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे तीन अध्यासन केंद्रास मंजुरी*
*प्रबोधनकार अभ्यासकेंद्र विद्यापीठात सुरु करणार*
*छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, स्व.शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्रासाठी प्रत्येकी ५० लक्ष निधी मंजूर*
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, स्व.शंकरराव चव्हाण असे तीन अध्यासन केंद्र सुरु करणार असल्याचे सांगून प्रत्येक अध्यासन केंद्रास रु.५० लक्ष निधी मंजूर करण्यात आल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.ना. उदयजी सामंत यांनी ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @ नांदेड’ हा अभिनव उपक्रमात जाहीर केले. याचबरोबर प्रबोधनकार अभ्यास केंद्र देखील विद्यापीठामध्ये सुरु करण्यात येणार आहे, असे मा. मंत्री महोदयांनी यावेळी जाहीर केले. महाराष्ट्रामध्ये सहा ठिकाणी प्रबोधनकार अभ्यास केंद्र सुरु करण्यात येणार आहे. त्यापैकी नांदेड विद्यापीठ हे एक आहे. इतर मुंबई, कोल्हापूर, अमरावती, पुणे आणि नागपूर या ठिकाणी आहे.
आज शनिवार, दि.१३ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या इनडोअर स्पोर्ट हॉल येथे आयोजित महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ नांदेड’ हा अभिनव उपक्रमामध्ये ते विद्यार्थी-पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि शैक्षणिक संस्था आदी विविध घटकांना संबोधित करीत होते. या उपक्रमामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन असे अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये एकूण ३७३ अर्ज प्राप्त झाले असून ३२२ अर्ज सकारात्मकपणे निकाली काढण्यात आले.
विद्यापीठ परिसरामध्ये गणितीयशास्त्र संकुलाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना.अशोकरावजी चव्हाण व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.ना.उदयजी सामंत या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. संकुलाच्या नवीन इमारतीत आयसीटीने सुसज्ज अशा ३ वर्ग खोल्या आहेत. त्याबरोबरच संशोधनासाठी उपयुक्त असणाऱ्या विविध सॉफ्टवेअरने परिपूर्ण अशा २ संगणक प्रयोगशाळा व संशोधक विद्यार्थ्यांसाठी संशोधनपूरक असे २ संशोधन कक्ष आहेत. यावेळी गणितीयशास्त्रे संकुलाच्या परिसरामध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
विद्यापीठामध्ये उपलब्ध असलेली उपकरणे, मानवी संसाधने याचा उपयोग करून ‘कोव्हीड-१९’ची नमुना तपासणी प्रयोगशाळा सुरू करावी असा विद्यापीठाचा मानस होता. तसा प्रस्ताव तयार करून आयसीएमआरकडे पाठविला असता अत्यंत अल्प कालावधीत आयसीएमआरने सदर प्रयोगशाळेस मंजुरी दिली आहे. ही प्रयोगशाळा सुरू करणारे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिले व देशातील दुसरे अकृषि विद्यापीठ आहे. या लॅबची सर्व सन्माननीय मान्यवर महोदयांनी पाहणी करून ‘कोव्हीड-१९’ची नमुना तपासणी प्रयोगशाळा अल्पावधीत उभारणीसाठी परिश्रम घेतलेल्या डॉ.गजानन झोरे, डॉ.राजाराम माने, डॉ.एस.जे.वाढेर आणि कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे यांचा मा.मंत्री महोदयांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी आ.अमर राजूरकर, आ.मोहनराव हंबर्डे, आ.बालाजीराव कल्याणकर, शिक्षक आ.विक्रम काळे यांच्यासह विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, संचालक (उच्च शिक्षण) डॉ.धनराज माने, संचालक (तंत्र शिक्षण) डॉ.अभय वाघ, प्र.संचालक (ग्रंथालय) शालिनी इंगोले, सहसंचालक (उच्च शिक्षण), नांदेड डॉ. नलिनी टेंभेकर, राजीव मिश्रा, संचालक (कलाशिक्षण), विनोद मोहितकर, संचालक (महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ), गोपीचंद चव्हाण (उच्च व तंत्र शिक्षण, मंत्रालय), कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि विद्यापीठ गीताने करून स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षण, संशोधन, क्रीडा, सांस्कृतिक आदी क्षेत्रामध्ये विशेष प्राविण्य मिळविलेले प्राध्यापक डॉ.एस,जे. वाढेर, डॉ.बी.एस.दवणे, डॉ.सिंकूकुमार, डॉ.डी.डी.पवार, डॉ.ओमप्रकाश येमूल, डॉ.के.विजयकुमार आणि विद्यार्थी हरिदास उमाटे, महेश रेंगे, परमज्योतसिंघ सिंधू, पंकज पवार, सुषमा सूर्यवंशी, अतिश तानगावडे, मंदिपसिंग सिलेदार, विजयकुमार साळुंके आदींच्या विशेष कार्याचा गौरव व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून करण्यात आला.
मा.मंत्री महोदयांमार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे सर्वच स्थरावरून स्वागत करण्यात येत आहे. अनेक घटकांचे अनेक प्रश्न होते. प्रत्येकवेळी मंत्रालयात जावून या प्रश्नांची सोडवणूक होतेच असे नाही. पण या उपक्रमामुळे अनेकांचे अनेक प्रश्न मार्गी लागले तर बरेच प्रश्न जाग्यावर सोडविण्यात आले.
आजच्या या उपक्रमात अनुकंपा तत्वावर पाच नियुक्तीचे आदेश, वैद्यकीय प्रतीपुर्तीचे बारा आदेश, भविष्य निर्वाह निधीचे आठ ना-परतावा आदेश आणि मृत्य-नि-सेवा उपदानच्या रकमेचे धनादेश आदेश आठ सेवानिवृत्त व्यक्तींना वितरीत करण्यात आले. तीन महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह विवरणपत्र आणि भविष्य निधीचे पाच अंतिम आदेश वितरीत करण्यात आले.
यावेळी परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अभ्यासक्रमाची उजळणी घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन शिकवणी वर्गास उपस्थित राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच विद्यापीठातील सहा संवैधानिक पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली. आणि शिक्षक व शिक्षकेत्तर पदांचा आकृतिबंध मंजुरीसाठी प्रयत्न करणार, न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली येथील शिक्षक-शिक्षकेतर पदांना मंजुरी देणार, लातूर उपपरिसर व परभणी उपकेंद्रासाठी शासकीय जागा मिळवून देणार तसेच हैद्राबाद येथे इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फोर्मेशन सर्व्हिसेस रिसर्च सेंटर यासाठी मान्यता देणार असल्याचे यावेळी मंत्री महोदयांनी जाहीर केले.
सेंटर ऑफ एक्सलंस साठी रुसाच्या माध्यमातून निधी देण्यासाठी निर्देश, प्री-आय.ए.एस. प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार आणि विद्यापीठाच्या ऑडीटोरियम बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून देणार आणि हळदी मधील कुरुकुमिनचे प्रमाण तपासण्यासंदर्भात विद्यापीठ आणि नंदीग्राम अॅग्रो, येळेगाव या शेतकरी उत्पादन संस्थेशी सहकार्य करार करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील हळद उत्पादन शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.राजेंद्र गोणारकर यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. या उपक्रमास विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.वैजयंता पाटील, डॉ.महेश मगर, विविध प्राधिकरणाचे सन्माननीय सदस्य, संवैधानिक अधिकारी, विद्यार्थी-पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि शैक्षणिक संस्था आदी विविध घटकांतील सन्माननीय मान्यवर उपस्थित होते.