You are currently viewing “रामराज्य” म्हणून उल्लेखलेलं राजघराणे राजकारणात सक्रिय तरीही……

“रामराज्य” म्हणून उल्लेखलेलं राजघराणे राजकारणात सक्रिय तरीही……

विशेष संपादकीय…..

*”रामराज्य” म्हणून उल्लेखलेलं राजघराणे राजकारणात सक्रिय तरीही……*

*सावंतवाडीच्या संस्कृतीला लागले राडा संस्कृतीचे ग्रहण*

सावंतवाडी संपूर्ण जिल्ह्यात सुसंस्कृत, सुशिक्षित, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर म्हणून ओळखले जाते. आम. दिपक केसरकर यांनी गेली तीन दशके सावंतवाडीवर आपल्या शांत संयमी नेतृत्वातून अधिराज्य गाजवलं आहे. त्यामुळे सावंतवाडी शहराची ओळख ऐतिहासिक शहर म्हणून सांगताना आज राज्यात प्रत्येक जण आम. दिपक केसरकर यांचे शहर सावंतवाडी काय..? असा प्रश्न उपस्थित करतो. त्याचे कारणही शहराला लाभलेलं शांत सुंदर शहर हे विशेषण आणि त्या संयमाला आम. केसरकर नावाची लागलेली झालर..!

*शांत संयमी, सुसंस्कृत सुंदरवाडीत धमक्या मारामाऱ्या संस्कृती कोणाची..?*
जिल्ह्यात इतरत्र निवडणुका असल्यावर काही शहरांमध्ये तणावग्रस्त,संवेदनशील बूथ म्हणून शहरात पोलिस गस्त वाढवली जाते परंतु, सावंतवाडी शहरात याच्या विपरीत परिस्थिती असायची. यापूर्वी मतदान मग ते विधानसभेचे असो की, लोकसभा सर्वकाही शांततेतच व्हायचं. पण, काल नगरपालिका निवडणुकीत पैशांचा पडलेला पाऊस, उभे राहिलेले टोकाचे संघर्ष, शिगेला पोचलेला प्रचार, हमरातुमरी, गाडी अंगावर घालण्याचे, एकमेकांवर धावून जाण्याचे प्रकार, धक्काबुक्की आणि विनाकारण केलेला रस्त्यावरचा असो की खुद्द पोलिस स्टेशनमधील भाजप शिवसेना कार्यकर्त्यांचा राडा ..! ही रामराज्य म्हणून महात्मा गांधींनी गणना केलेल्या सावंतवाडी शहराची संस्कृती कधीही नव्हती. ती आता नव्याने रुजू पाहतेय.. तिला खतपाणी कोण घालतं आहे.. ? त्या राड्यांना संरक्षण कोण देतंय..? कोण राडेबाजांना पाठीशी घालतं आहे..? आणि कोणामुळे राडेबाज आज पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांच्या समोरच खून करण्यासारख्या धमक्या देतात आणि आपण छत्रपतींच्या महाराष्ट्रात नव्हे बिहार मध्ये आहोत की काय..? असा स्वतःलाच प्रश्न पडू लागला आहे.

*राजघराण्याचा राजकारणात प्रवेश आणि रुजू पाहणारी राडा संस्कृती एक योगायोग..?*
जवळपास गेली पंचवीस वर्षे राजघराण्यातील कोणीही राजकारणात उडी घेतली नव्हती. परंतु अलीकडेच परदेशात शिक्षण घेतलेले लखमराजे भोसले यांनी नकळत सावंतवाडीच्या राजकारणात प्रवेश केला आणि साहजिकच राजघराण्याला आपल्या पक्षात स्थान देण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील भाजपा पुढे सरसावला. राजघराण्याचा राजकारणात प्रवेश झाला असल्याने भाजपा कार्यकर्त्यांकडून संयमी आणि सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा असताना सावंतवाडी शहरात टोकाचा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. किंबहुना राजघराण्याला पुढे करून राजघराण्याच्या आडून सावंतवाडीत राडा संस्कृती पोसली जाते आहे की काय ..? असा संशय येण्यासारखी तणावग्रस्त परिस्थिती शहरात आणि अगदी पोलिस स्टेशनमध्ये निर्माण झालेली सावंतवाडीकरांनी अनुभवली. पोलिसांच्या समोरच खून करण्याच्या धमक्या देताना भाजपाचे कार्यकर्ते व्हिडिओ मध्ये कैद झाले त्यामुळे राडा संस्कृती कोण पोसते आहे..? हे संपूर्ण देशाने, जगाने पाहिले. राडा संस्कृतीचा सावंतवाडीत झालेला जन्म आणि राजघराण्याचा सावंतवाडी शहरातील राजकारणात झालेला प्रवेश हा योगायोग आहे, भविष्यातील संघर्षमय नकारात्मक राजकारणाची नांदी की, घडवून आणलेलं षडयंत्र..?

*गांधी चौकात झालेला गोळीबार आणि त्यानंतरची शांत सावंतवाडी*
कित्येक वर्षांपूर्वी सावंतवाडीच्या गांधी चौकात गोळीबार झालेला होता. त्यावेळी त्या गोळीबाराला देखील सावंतवाडीचा काहीही संबंध नव्हता. बाहेरील लोकांकडून सदरची घटना घडली होती. परंतु, त्यावेळी सावंतवाडी शहराच्या नावाला मात्र गालबोट लागले होते. त्यानंतर सावंतवाडी शहरात अनेक राजकीय स्थित्यंतरे आली..पण, कधीही शहराने आपल्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे हे विसरले नाही. मोठमोठे मोर्चा, आंदोलने देखील शहराने अंगाखांद्यावर खेळवली आहेत परंतु, बापूसाहेबांचं रामराज्य, पाटेकराचा आशीर्वाद, साटम महाराजांची कृपा आणि उपरलकर देवतेचे संरक्षण कवच यामुळे शहरातील सर्वधर्मीय लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. जिल्हा राजकीय वातावरणाने तापत असताना देखील इथले राजकारणी राजकारणापेक्षा शहरात समाजकारण करताना दिसतात. त्यामुळेच आम. दिपक केसरकर यांच्या सारखे शांत संयमी नेतृत्व आक्रमकता न दाखवता देखील तीन दशके शहरात अधिराज्य गाजवत राहिले.

*सावंतवाडीत राडा संस्कृती आली कुठून..? आणि का रुजते आहे…?*
राडा हा शब्द सावंतवाडीकर राजस जनतेला तसा नवीनच आहे. कारण, शहराने राजकीय राडे पाहिलेच नाहीत आणि राडा संस्कृती असलेले लोकप्रतिनिधी, नेते कदाचित सावंतवाडीत जन्मासच आले नाहीत. परंतु जिथे विधानसभेच्या निवडणुकीत ट्रेलर सुद्धा पाहायला मिळाले नाहीत त्या सावंतवाडीत अचानक नगरपालिका निवडणुकीत राडे सुरू झाल्याचे आपण पाहिले. हे राडे होत असताना काहीसं मागे जाऊन विचार केला असता सत्तेतील राजकीय पक्षांनी १००% नगरपालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी तन मन अर्पून काम करण्यापेक्षा धनाची बरसात करून सावंतवाडीची संस्कृतीच बदलून टाकली…आणि त्यामुळेच सावंतवाडीत राजकीय सत्तासंघर्ष निर्माण झाला. प्रत्येक जण सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी वाट्टेल ते करण्यास तयार झाला आणि शहरातील शांतता बिघडली. पण..,
एक विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे….,
ही राडे संस्कृती शहरातील, तालुक्यातील राजकीय नेत्यांनी आणली का..?
ही राडे संस्कृती कधी सुरू झाली..? कुठल्या शहरातील राडेबाज यासाठी खतपाणी घालतात..?
कुठल्या शहरातून आणि कोणाची सत्ता असताना ही राडे संस्कृती सावंतवाडी शहरात आली..?
कुठल्या नेत्याने या राडे संस्कृतीला कसे आणि कुठल्या मार्गांनी पोसले..? पाठबळ दिले..? आणि कोणी ती वाढवली..? याचा सावंतवाडीकरांनी वेळीच विचार करावा जेणेकरून भविष्यात सावंतवाडी म्हणजे ऐतिहासिक नव्हे तर राडेबाजांचे शहर अशी ओळख निर्माण होणार नाही…!

प्रतिक्रिया व्यक्त करा