– भाजपा सावंतवाडी महिला शहराध्यक्षा सौ.मोहिनी मडगावकर यांचा शिवसेनेला टोला
जनतेने जोडे मारत नाकारलेल्या जान्हवी सावंतनी आता जगावर जोडे मारत फिरू नये. राणेंना विरोध करून नेते खुश होतात, पण जनता नाही, हे एव्हाना कळायला हवे होते.
उच्चस्तरीय भाजपा नेते आणि देशाचे गृहमंत्री मा. अमितजी शाह याची भेट घेण्यासाठी मोठमोठे नेते तिष्ठत बसलेले असतात. अशा या नेत्याने ना.नारायणराव राणेसाहेबांचे आमंत्रण स्वीकारत सिंधुदुर्गाला भेट दिली. त्यांच्या कामाचे कौतुक केले. आधीच राणेद्वेषाची कावीळ झालेल्या शिवसेनेला देशपातळीवर राणेसाहेबांचे वाढलेले वजन पाहून पोटशूळ उठणे साहजिक होते आणि या पोटशूळाच्या वेदना खा. विनायक राऊत यांच्या तोंडातून बाहेर पडल्या. कोकणात स्वतः काही करू शकत नाहीत आणि करणाऱ्याला करू द्यायचे नाही, अशा नतद्रष्ट मनोवृत्तीच्या विनायक राऊतांनी राणेंवर खालच्या पातळीवर उतरत टीका केली. भाजपा कार्यकर्त्यांना याचा संताप येणे साहजिकच असताना त्या आगीत तेल ओटण्याचे काम या धैकाल्यातल्या संकासुर वैभव नाईक यांनी केले. भाजपा कार्यकर्त्यांनी विनायक राऊत यांना जोडे मारावेत हीच त्यांची त्यामागची सुप्त इच्छा होती आणि ती त्यांनी पूर्ण करून घेतली. हल्ली काहीच काम न उरलेल्या शिवसेनेच्या महिला नेत्या जान्हवी सावंत यांनी या आयत्या रंगमंचावर नाचून घेतले. जनतेने आपल्याला मतदार संघातून जोडे मारून हाकलून दिले आहे हेदेखील त्या विसरल्या. राणेसाहेबांवर टीका करून आणि असली जोडे-मारीची स्टंटबाजी करण्यापेक्षा जनतेत जाऊन त्यांनी काम करावे, नेत्यांना खुश करुन करियर होईल या भ्रमात वावरत दिवा-स्वप्न पहायची सोडून द्यावीत, यातच त्यांचे हित आहे. राणेंच्या द्वेषातून जिल्ह्यात कितीही “धैकाला” घातलेत तरी विजयाची हंडी भाजपाच फोडणार आणि त्याची सुरुवात या जिल्ह्यातुन झालेलीच आहे, असा सणसणीत टोला भाजपा सावंतवाडी शहराध्यक्षा सौ. मोहिनी मडगावकर यांनी शिवसेनेला लगावला आहे.