21 डिसेंबरला एकाच दिवशी सर्व निकाल
निवडणूक प्रक्रियेत ‘सिस्टीम फेल’; आयोगाने सुधारणा कराव्या – फडणवीसांची तीव्र प्रतिक्रिया
मुंबई :
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालाबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज महत्त्वाचा निर्णय सुनावला आहे. काही नगरपरिषदांच्या न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्यामुळे सुमारे 20 ठिकाणी मतदान पुढे ढकलण्यात आले होते. ही मतदान प्रक्रिया 20 डिसेंबर रोजी होणार होती. त्यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर न झाल्यास निकालांवर परिणाम होऊ शकतो, या भूमिकेतून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
सर्व युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने सर्व नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबर रोजीच जाहीर करण्याचे निर्देश दिले. आज झालेल्या मतदानांचे निकालही 21 तारखेलाच जाहीर करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच एक्झिट पोल 20 डिसेंबर रोजी मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासाने जाहीर करण्यास परवानगी देण्यात आली असून आदर्श आचारसंहिता 20 तारखेपर्यंत लागू राहणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देताना तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, २५-३० वर्षांत असा प्रकार प्रथमच पाहतो. घोषित निवडणुका पुढे चाललेल्या, निकाल पुढे ढकललेले… योग्य नाही. उमेदवार दिवसन्दिवस मेहनत करत असताना अचानक प्रक्रियेत बदल झाल्याने त्यांचा भ्रमनिरास होत असल्याचे त्यांनी नमूद केले. “निवडणूक आयोग स्वायत्त आहे, न्यायालयही स्वायत्त आहे, परंतु अशा घटना होऊ नयेत. पुढील निवडणुकांत सुधारणा आवश्यक आहेत.”
फडणवीस पुढे म्हणाले, “EC ची चूक नाही. चुकीचे कायदेशीर अर्थ लावले गेले ही खरी समस्या आहे.” निवडणूक आयोगाच्या वकिलांनी भूमिका नीट मांडली नाही, असा सूचक आरोप त्यांनी केला. “जिथे नियम व्यवस्थित पाळले आहेत तिथे कोणीतरी कोर्टात गेल्यामुळे निवडणूक पुढे नेणं – हे कोणत्याही तत्त्वाला धरून नाही.” कायद्याच्या चुकीच्या वापरामुळे संपूर्ण प्रक्रियेलाच धक्का बसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
