You are currently viewing उद्योजिका सौ.अन्नपूर्णा कोरगावकर नगराध्यक्ष पदाचा आश्वासक चेहरा
Oplus_16908288

उद्योजिका सौ.अन्नपूर्णा कोरगावकर नगराध्यक्ष पदाचा आश्वासक चेहरा

 

सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आणि नगराध्यक्षपदासाठी महिला आरक्षण पडले तेव्हा भारतीय जनता पक्षाकडून साहजिकच अनुभवी, उच्चशिक्षित आणि अनेकांना आयटी क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या उद्योजिका आणि माजी उपनगराध्यक्षा सौ.अन्नपूर्णा कोरगावकर यांचेच नाव पुढे येईल असे गृहीत धरण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची मुलाखत देखील घेण्यात आली परंतु त्यांच्या उमेदवारीचा विचार करण्यात आला नाही. यापूर्वी देखील एका निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती त्यावेळी त्यांनी बंडखोरी करून नगरसेवक पदाची निवडणूक सहज जिंकली होती. मागील निवडणुकीतील अनुभव लक्षात घेता सौ.कोरगावकर यांनी पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी दाखल करून सावंतवाडीकरांना आपले विकासाचे व्हिजन दाखवत निवडून देण्याचे आवाहन केले आहे.

सावंतवाडी शहरात कृषी अवजारे, बी बियाणे, खते आदी विक्रीचे दालन सुरू करून व्यवसायात पाऊल ठेवणाऱ्या सौ.कोरगावकर यांनी एक महिला व्यवसायात उतरली तर काय करू शकते याचे उत्तम उदाहरण दाखवून देत आपल्या कृषी क्षेत्रातील व्यवसायात प्रगती करत सावंतवाडी शहरात कृषी अवजारे, मशिनरी आदी आधुनिक उपकरणे उपलब्ध करून देत जिल्हाभरातील शेतकऱ्यांना आश्वासक दालनाच्या माध्यमातून चांगली सुविधा, सेवा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे त्यांचे नाव जिल्हाभरात सर्वदूर पोचले. गेल्या वर्षभरापूर्वी त्यांनी सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथे आयटी कंपनीची मुहूर्तमेढ रोवली आणि सावंतवाडीसह आजुबाजूच्या युवक युवतींसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या. त्यामुळे बेरोजगारांना रोजगार देणाऱ्या यशस्वी उद्योजिका म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाऊ लागले.

सावंतवाडी नगरपालिकेत अपक्ष नगरसेविका म्हणून निवडून गेल्यानंतर एकमेव अपक्ष उमेदवार असलेल्या सौ.कोरगावकर यांना भाजपाचे आपल्यासोबत घेत त्यांची उपनगराध्यक्ष पदी वर्णी लावली होती. उपनगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवत एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यामुळे त्यांचा उपनगराध्यक्ष पदाचा अनुभव, शहरात असलेली त्यांची उद्योजिका ही प्रतिमा आणि राजकीय कारकिर्द पाहता त्यांनाच भाजपची नगराध्यक्षपदी पहिली पसंत असेल असेच गृहीत धरण्यात येत होते. परंतु सावंतवाडीच्या राजघराण्याच्या युवराज्ञी श्रद्धादेवी भोसले यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केल्याने भाजपाने त्यांना उमेदवारी घोषित केली. परिणामी भाजपा मधून उत्सुक असलेल्या सौ.अन्नपूर्णा कोरगावकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली.

सावंतवाडीतील बेरोजगार युवाईला रोजगार उपलब्ध करून देण्याचा केलेला संकल्प, शहरातील ड्रेनेज व्यवस्था, पाणीपुरवठा व्यवस्था, रस्ते आदी विविध समस्या मार्गी लावण्याची दिलेली ग्वाही यामुळे विकासाचे व्हिजन असलेल्या, उद्योजिका म्हणून नावाजलेल्या उच्चशिक्षित नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून सावंतवाडीकर नक्कीच मत रुपी आशीर्वाद देऊन सौ.अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या मेणबत्ती निशाणीला मतदान करतील अशी आशा वाटत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा