यमुनानगर निगडी –
विठ्ठल रुक्मिणी मंदिर ,मुक्ताई गार्डन ,यमुना नगर या संस्थेचे अध्यक्ष श्री अंकुशजी जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरामध्ये नियमित हरिपाठ व काकड आरतीला येणाऱ्या भाविकांसाठी एक दिवसाची पंढरपूर यात्रा आयोजित केली.
दिनांक १९ नोव्हेंबर रोजी आरामशीर लक्झरी बस मध्ये पहाटे पाच वाजून पन्नास मिनिटांनी शंभर भाविकांनी पंढरपूर यात्रेला प्रारंभ केला. भिगवण येथे सर्वांना अल्पोहार व चहापान देऊन पुन्हा लक्झरी बस पंढरपूरला रवाना झाल्या. दुपारी बारा वाजता पंढरपूरला आगमन झाले. गोपाळपुरा, विष्णुपद मंदिरातील देवाचे दर्शन घेऊन नामदेव पायरी जवळ सर्वजण आले. परीपूर्ण नियोजन केल्यामुळे सर्वांना ऑनलाइन पास उपलब्ध झाले. तासाभरात विठ्ठल व रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन घेऊन सर्व भाविक मनाने तृप्त झाले.दर्शनानंतर सर्व भाविकांनी सुग्रास पुरणपोळी भोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर भाविकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यमुना नगर मधील बहुसंख्य ज्येष्ठ नागरिकांनी या सहलीचा आनंद लुटला. ऑनलाइन पास, लक्झरी बस, नाश्ता व महाप्रसादाची उत्तम सोय केल्यामुळे सर्व भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर सेवाभावी संस्थांच्या सर्व ट्रस्टींना प्रसन्न आशीर्वादाचा दुवा दिला.
बस मध्ये हरिपाठ, सुगम संगीत, गाण्याच्या भेंड्या, कविता वाचन, नाट्यछटा, पोवाडा, लोकप्रिय गाण्याच्या तालावर नाचण्याचा मोह कोणालाच आवरता आला नाही. सर्व भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर सेवा समिती ट्रस्ट अध्यक्ष अंकुश जगदाळे ,यमुना नगर जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गजानन ढमाले ,श्री आप्पा काळोखे, श्री मच्छिंद्र महाकाळ श्री अनंत महाराज मोरे, श्री मंगल महाराज जगताप ,श्री गणेश इंगवले ,सौ नयना पारखे ,सौ संगीता टुपके, शशिकला उभे यांना यात्रा सुखदायी केल्याबद्दल धन्यवाद दिले.
