You are currently viewing भारतीय वास्तु विशारद संस्थेच्या ‘रत्नसिंधु’ उपकेंद्राचे रत्नागिरीत भव्य उद्घाटन

भारतीय वास्तु विशारद संस्थेच्या ‘रत्नसिंधु’ उपकेंद्राचे रत्नागिरीत भव्य उद्घाटन

भारतीय वास्तु विशारद संस्थेच्या ‘रत्नसिंधु’ उपकेंद्राचे रत्नागिरीत भव्य उद्घाटन

रत्नागिरी

रविवार, दि. 22 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय वास्तु विशारद संस्थेच्या (Indian Institute of Architects – IIA) रत्नागिरी-सिंधुदुर्ग उपकेंद्र ‘रत्नसिंधु’ चे रत्नागिरी येथे दिमाखात उद्घाटन करण्यात आले. संस्थेचे महाराष्ट्र अध्यक्ष आ. संदीप प्रभू, महाराष्ट्र सचिव आ. शेखर बागुल, राष्ट्रीय मानद सल्लागार (कायदे समिती) आ. राजीव तायशेटये तसेच IIA कोल्हापूर केंद्राच्या अध्यक्षा आ. संगीता भांबुरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढवून उपकेंद्राचे विधिवत उद्घाटन झाले.

या प्रसंगी ज्येष्ठ वास्तुविशारद हेमंत कापडी, उपकेंद्राचे मानद संचालक व मार्गदर्शक संतोष तावडे, ज्येष्ठ उद्योजक केशवराव इंदुलकर तसेच रत्नागिरी मनोरुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले उपस्थित होते. क्रेडाई रत्नागिरीतर्फे दीपक साळवी आणि सहकाऱ्यांनी तसेच बार असोसिएशनतर्फे अॅड. विलास पाटणे यांनी शुभेच्छा देऊन उपकेंद्रास यशस्वितेच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्र अध्यक्ष संदीप प्रभू यांनी कोकणातील विकासकार्यात स्थानिक वास्तुविशारदांची जबाबदारी महत्त्वाची असल्याचे नमूद केले. “कोकणची पारंपरिक वास्तुशैली आणि पर्यावरणीय संवेदनशीलता जपत विकास साधणे ही काळाची गरज आहे. या उपकेंद्राच्या माध्यमातून संस्था नेहमी मार्गदर्शन आणि पाठिंबा देत राहील,” असे ते म्हणाले. राष्ट्रीय सहसचिव संदीप बावडेकर प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नसले तरी त्यांनी शुभेच्छा संदेश पाठवून केंद्रास अभिनंदन दिले.

भारतीय वास्तु विशारद संस्था (IIA) ही 108 वर्षांचा वारसा असलेली राष्ट्रीय पातळीवरील आर्किटेक्ट्सची प्रमुख संस्था आहे. बॅचलर ऑफ आर्किटेक्चर पदविधारक आणि काउंसिल ऑफ आर्किटेक्चरमध्ये नोंदणीकृत 30 हजारांहून अधिक वास्तुविशारद या संस्थेशी संलग्न आहेत. व्यावसायिकांचे हितसंबंध जोपासणे, आर्किटेक्चर क्षेत्रातील शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे व देशातील वास्तुविशारदांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही संस्थेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

‘रत्नसिंधु’ उपकेंद्रामुळे कोकणातील विकासकार्यात व्यावसायिक वास्तुसेवेचा महत्त्वपूर्ण हातभार लागणार असून रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील वास्तुविशारदांना एक सशक्त व्यासपीठ मिळणार आहे.

नवीन पदभार स्वीकारलेले पदाधिकारी

अध्यक्ष: आ. मकरंद केसरकर

उपाध्यक्ष: आ. गौरी सामंत

सचिव: आ. श्रेया इंदुलकर

कोषागार: आ. संजना शेट्ये

कार्यकारिणी सदस्य:
आ. अभिषेक माने, आ. शंकर सावंत, आ. मेघा पंडित, आ. निलेश गुंदेचा, आ. मंजिरी शेंडे

मानद संचालक व सल्लागार: आ. संतोष तावडे

या भव्य सोहळ्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गातील वास्तुविशारदांना नवीन ऊर्जा मिळाली असून भविष्यात या उपकेंद्रामार्फत कोकणातील वास्तुविकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा