रिंगरोडपासून पर्यटन महोत्सवापर्यंत; शहराच्या विकासाचा रोडमॅप जनतेसमोर
सावंतवाडी :
सावंतवाडी शहराच्या भविष्यासाठी सुबक, नियोजनबद्ध विकासाची दिशा ठरवण्याचा संकल्प करीत माजी नगराध्यक्ष व भाजपचे प्रभाग क्रमांक २ चे उमेदवार बबन साळगावकर यांनी आज पत्रकार परिषदेत जोरदार भूमिका मांडली. “ज्येष्ठतेचा अनुभव आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा निर्धार याच्या आधारे आगामी काळात शहराचा कारभार अधिक सक्षमपणे सांभाळणार,” असे त्यांनी स्पष्ट केले.
जानेवारीतील सावंतवाडी पर्यटन महोत्सवासह विविध प्रकल्प मार्गी लावण्याचा मानस असल्याचे सांगत त्यांनी मतदारांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धा भोसलें यांच्यासह सर्व भाजप उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे आवाहन केले. यावेळी दादू कविटकर, सुनीता पेडणेकर, दीपक सावंत आदींची उपस्थिती होती.
साळगावकर म्हणाले, “आमचा लढा हा विकासाच्या मुद्द्यांवर आहे; वैयक्तिक टीकेला येथे स्थान नाही.” रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून ६४ कोटींची नळपाणी योजना मंजूर होऊन काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प दुर्लक्षित राहिल्याची खंत व्यक्त करत, “हा प्रकल्प आदर्शरूपात उभारून दाखवू,” असा विश्वासही त्यांनी दिला.
तसेच महत्त्वाचा रिंगरोडचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
“आम्ही वचननामा घेऊन जनतेसमोर जात आहोत. या आश्वासनांची पूर्तता करण्याची जबाबदारी माझी, तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोसलें यांची आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
अंडरग्राउंड वीजवाहिन्या प्रकल्प अपूर्ण राहण्याचे कारण निधी न मिळाल्याने झाल्याचे सांगत ते म्हणाले, “युवराज्ञी श्रद्धाराजे ऊर्जावान, कार्यक्षम असून घराघरातून त्यांचे स्वागत होत आहे. त्यांचा विजय निश्चित आहे.”
मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल संदर्भातील प्रश्नावर त्यांनी उत्तर देताना, “प्रकल्प कोणी आणला याचे उत्तर त्यांच्याकडूनच घ्यावे,” असे सूचक विधानही केले.
