नगराध्यक्ष उमेदवार ॲड. निता सावंत–कविटकर आणि सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन
सावंतवाडी :
सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत विजयाचा ध्वज फडकवण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी शहरात जोरदार प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. कॉर्नर बैठकीत थेट जनतेला भेट देत त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. निता सावंत–कविटकर आणि सर्व २० नगरसेवकांना विजयी करण्याचे आवाहन केले. “सर्व उमेदवार प्रामाणिक आणि विकासाभिमुख आहेत; जनता निश्चितच विश्वास ठेवेल,” असा ठाम विश्वास केसरकरांनी व्यक्त केला.
बाहेरचावाडा परिसरातील प्रभाग १ व ४ मध्ये केसरकरांनी काढलेल्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मतदारांना भेटून त्यांनी उमेदवारांची ताकद अधोरेखित केली. ॲड. कविटकर यांच्या नावावर मोठ्या मताधिक्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच ॲड. सायली दुभाषी, प्रसाद नाईक, हर्षा जाधव आणि बासिर पडकळकर यांना मतदार निश्चितच भरघोस मतदान करतील, असेही त्यांनी सांगितले.
प्रचार सभेला शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, माजी नगरसेवक नासिर शेख, काशीनाथ दुभाषी, बंटी पुरोहित, आबा केसरकर, सचिन साटेलकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
