You are currently viewing मालवणमध्ये नितेश राणेंचा प्रभागवार दौरा; भाजपच्या विजयाची खात्री व्यक्त
Oplus_16908288

मालवणमध्ये नितेश राणेंचा प्रभागवार दौरा; भाजपच्या विजयाची खात्री व्यक्त

शिल्पा खोत नगराध्यक्षपदासाठी प्रबळ; प्रभागनिहाय बैठकीत नागरिकांशी थेट संवाद, उमेदवारांना विजयासाठी आवाहन

मालवण :

मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी सायंकाळी शहरातील प्रभाग निहाय दौरा करीत नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्‍नांना सकारात्मक प्रतिसाद देत हे प्रश्‍न सोडवण्याची ग्वाही त्यांनी दिली. नगराध्यक्षपदी भाजपच्या उमेदवार सौ. शिल्पा यतीन खोत यांचा विजय निश्चित असल्याचे सांगत त्यांनी पालिकेवर भाजपची निर्विवाद सत्ता येणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.

यापूर्वी गुरुवारी सकाळी ना. नितेश राणे वायरी येथे मातृत्व आधार फाउंडेशनच्या कार्यक्रमात सहभागी झाले. संस्थेने पालिका निवडणुकीत भाजपला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी संस्थेचे आभार मानले आणि सामाजिक प्रश्न सोडवण्याची आश्वस्तता दिली. त्यानंतर त्यांनी सायंकाळी शहरातील प्रभागनिहाय प्रचार दौऱ्याला सुरुवात केली.

प्रभाग क्रमांक १ मध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार मंदार केणी यांच्या घराजवळील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा खोत यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार मंदार केणी आणि सौ. दर्शना कासवकर यांना विजयी करण्याचे आवाहन ना. राणे यांनी केले. त्यानंतर प्रभाग क्रमांक २ मध्ये राजू आंबेरकर यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. येथेही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा खोत यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार ललित चव्हाण आणि सौ. अमृता फाटक यांना विजयी करण्याचे आवाहन राणे यांनी केले.

यानंतर बांगीवाडा समाजमंदिराजवळ झालेल्या प्रभाग क्रमांक ५ च्या बैठकीत ना. राणे यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेतले. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा खोत यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार यतीन खोत आणि महानंदा खानोलकर यांच्या विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढे प्रभाग क्रमांक ७ मधील मशीद गल्ली येथे झालेल्या बैठकीत उपस्थित नागरिकांचे प्रश्न समजून घेत त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा खोत आणि नगरसेवक पदाचे उमेदवार सौरभ ताम्हणकर व सौ. दीपाली वायंगणकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

प्रभाग क्रमांक ८ मध्ये भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करून ना. राणे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. येथे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा खोत यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार संतोष शिरगावकर आणि सौ. मरीना फर्नांडिस यांना विजय मिळवून देण्याचे आवाहन त्यांनी केले. शेवटी प्रभाग क्रमांक ३ मध्ये प्रदीप मुंबऱकर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा खोत यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार पंकज सादये आणि सुवर्णा वालावलकर यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या सर्व प्रचारसभांना भाजपचे निवडणूक निरीक्षक प्रमोद रावराणे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, रणजित देसाई, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, शहर मंडल अध्यक्ष बाबा मोंडकर, महेश मांजरेकर, विजय केनवडेकर, राजू परूळेकर, विजय निकम, संतोष गावकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा