*ज्येष्ठ लेखिका गझलकारा सुनंदा पाटील “गझलनंदा” लिखित अप्रतिम गझल*
*ओठा मधली साखर होते आई*
ओठामधली साखर होते आई
भूक लागता भाकर होते आई
थंडी पडता कूस उबेची मिळते
अंगावरची चादर होते आई
आयुष्याचे काटे खुपती मजला
मऊसूतसे अस्तर होते आई
बाळ जन्मता दिव्यांगाचे पोटी
जन्मभराची चाकर होते आई
प्रश्न होउनी वळण उभे हे दारी
त्या प्रश्नांचे उत्तर होते आई
दिवा विझावा कसा अचानक रात्री
उंबरठ्यावर जागर होते आई
डोक्यावरती हात कोरडा फिरतो
दहा दिशांची पाखर होते आई
*गझलनंदा*
