समीर नलावडे व अबिद नाईक विजयाबाबत आत्मविश्वास
कणकवली :
कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीची अधिकृत घोषणा झाली असून या युतीच्या उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजपचे समीर नलावडे तर प्रभाग क्रमांक १७ मधून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक मैदानात आहेत.
गत निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी या प्रभागातून स्वतःला मिळालेल्या मताधिक्याची आठवण करून देत, यंदाही मतदानातून मोठे समर्थन मिळून दोघांचाही विजय निश्चित असल्याचा विश्वास श्री. नलावडे यांनी व्यक्त केला. भाजपने शहरात केलेल्या विकासकामांमुळे नगरपंचायतीवर पुन्हा भगवा फडकणार असल्याचे ते म्हणाले.
प्रभाग १७ मधील राष्ट्रवादीचे उमेदवार अबिद नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ कनकनगर येथे करण्यात आला. या प्रसंगी समीर नलावडे, अबिद नाईक, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर, राजू गावणकर, रवींद्र उर्फ बाबू गायकवाड आदी उपस्थित होते.
नलावडे म्हणाले, “निवडणुकीसाठी भाजप–राष्ट्रवादी (अ. पा.) युती झाली असून आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवत आहोत. विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यात वेळ न घालवता जनतेसमोर विकासाची कामे मांडत आहोत. त्यामुळे यंदा नगरपंचायतीत पुन्हा भाजपचे कमळ फुलणार आहे.”
