You are currently viewing गृहिणी, सन्मान दिवस की कुचेष्टाच…
Oplus_16908288

गृहिणी, सन्मान दिवस की कुचेष्टाच…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

गृहिणी, सन्मान दिवस की कुचेष्टाच…

 

गृहिणी.. गृह… घर सांभाळते ती गृहिणी. पूर्वी

स्त्रियांच्या शिक्षणाचे प्रमाण कमी होते. त्या आधी १८ व्या शतकात स्त्रियांनी शिकणे हा तर

अपराधच होता नि तो डॅा. आनंदीबाई जोशी यांनी

केला होता. पुरूष तर पुरूष स्त्रियाच स्त्रियांच्या

जास्त शत्रू होत्या. पुरुष म्हणाले, शिकायचे नाही,

म्हणजे शिकायचे नाही. या अडाणी स्त्रियांनी का? हा प्रश्नच विचारला नाही नि स्त्रिया गुलाम

झाल्या त्या कायमच्या. या पुरूषप्रधान समाज व्यवस्थेने त्यांना पार टाचेखाली चिरडून टाकले.

 

डॅा. रखमाबाई म्हणाल्या मला डिव्होर्स पाहिजे तर

सारा पुरूष समाज ढवळून निघाला. एक स्त्री

नांदायचे नाही म्हणते म्हणजे काय? अरे वा! लग्न झाले आहे म्हणजे नांदलेच पाहिजे. हा कुठला कायदा? स्त्रियांना मत असतं की नाही?

तेव्हा नव्हतंच. मोठे मोठे सुशिक्षित लोक रखमाबाईंच्या विरोधात बोलू लागले. पण त्या

पुरून उरल्या. धैर्याने कोर्टाची लढाई लढल्या.

त्या काळी सुरत मध्ये हा खटला फार गाजला.

शेवटी त्या जिंकल्या व त्या अडाणी नवऱ्याकडे

नांदायला न जाता डॅा. बनून सुरत मध्येच ४० वर्षे

सिव्हिल सर्जन म्हणून त्यांनी सेवा बजावली व एक मैलाचा दगड बनल्या.

 

स्त्रियांना स्वातंत्र्य नाही, हे आमच्या नसानसात

मुरले आहे. जशी जात जात नाही तशी ही मानसिकताही जात नाही, गेली नाही कारण ती

राबवण्यात स्त्रियांचाच पुढाकार जास्त होता. खुद्द

रमाबाई रानडे ही त्याची शिकार झाल्या. ज्या ज्या स्त्रिया त्याकाळी शिकल्या त्या सर्वांना प्रचंड

मानसिक छळाला सामोरे जावे लागले. युरोप मध्ये सुद्धा मतदानासाठी लढा द्यावा लागला. ही

पुरुषप्रधान समाजव्यवस्था पुरुषांच्या अशी काही अंगवळणी पडली की ते ते तिचेच गुलाम

झाले.

 

जणू काही आपण देवाचेच प्रमाणपत्र आणले आहे व काहीही अत्याचार करायला मुखत्यार

आहोत असा त्यांना भ्रम झाला व अजूनही काही

प्रमाणात तो शिल्लक आहे. देवाने जोतिबा व सावित्री या देवदुतांना पाठवले नसते तर..

स्त्रियांचे काय झाले असते कल्पनाही करवत

नाही. खरे क्रांतिदूत तर तेच आहेत. त्यांनाही कसा कसा झगडा द्यावा लागला हे सर्वज्ञात आहे.

पुर्वी पासूनच स्त्री अशी दुर्दैवाची शिकार झाली

ती आजतागायत त्यातच अडकली आहे. अत्याचार संपले नाहीतच ते दिवसेंदिवस वाढत आहेत. ज्याने आपल्या बलाने तिचे रक्षण करावे

तेच तिच्या जिवावर उठले आहेत.

 

बाकीचे नादान आता गळा काढून म्हणतील,

स्त्रिया पुढारल्या हो? तुम्ही हे काय बोलताहे?

त्यांनी ही आपल्या अंतर्मनाला विचारावे स्त्री

कितपत स्वतंत्र झाली आहे. अहो, माहेरी जायलाही परवानगी लागते, बाकी तुम्हाला माहित आहे, कशाला मनाशी खोटं बोलता?

ताराबाई शिंदे खमक्या निघाल्या नि त्यांनी या

बुरसटलेल्या पुरुषप्रधान समाजाची अशी काही

चिरफाड करून अशी काही खिल्ली उडवली की

कुणी मायका लाल “ब्र” काढायला धजावला नाही.

 

या झाल्या मागच्या गोष्टी. स्त्री शिकली म्हणून

खरंच सुखी झाली आहे का? अजिबात नाही. तिच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला तरी तिचे

शील मात्र सुरक्षित नाही. अनेक बुबुक्षित लांडगे

सतत तिच्या मागे धावत तिला जगणे मुष्किल

करत आहेत. हे लांडगे काय बाहेरून आले आहेत? ते आपलेच बाप भाऊ मामा काका मेहुणे

साले आहेत ना? आपल्या घरातूनच बाहेर पडतात ना? मग वचक कोण ठेवेल? त्यांच्या

बुभुक्षित नजरा जाळायला काय देव खाली उतरणार आहे? आपल्याला कृष्ण का बनता

येत नाही? राम का बनता येत नाही? आपण सारे

काय रावणाचे वंशज आहोत? त्यालाही नीतिमत्ता होती. आम्ही तर सारीच सोडली आहे.

 

धर्म अर्थ काम मोक्ष.. कसलेच धरबंध आम्हाला

राहिले नाहीत. सारी लाजलज्जा बासनात गुंडाळून आम्ही खुंटीला टांगून ठेवली आहे. जनावरे तरी बरी, अशी म्हणण्याची वेळ माणसाने

आणली आहे. इतर उपभोग्य वस्तूंप्रमाणे स्त्रीला

फक्त त्याच एका नजरेने पाहिले जाते. त्या शिवाय जणू तिचे अस्तित्वच नाही.कुठे तो पतीपत्नीतला नाजुक शृंगार तर कुठे ही हिंस्र

बिभत्सता? प्रजनन हा सृष्टी क्रमाचा एक भाग

व जगण्याचे उद्दिष्ट आहे. माणसाची माणसापासून सृष्टी निर्माण होऊन सृष्टीचक्र

अखंड चालावे हा कामभावनेचा उद्देश आहे.

 

पण माणसाने माणसाला कुठे नेऊन ठेवले हो?

अगदी दैत्य बरे असे म्हणण्याची वेळ आणली आहे हो? आणि म्हणे, स्त्री देवता आहे. सारे थोतांड आहे हे! यांच्या वासना नरकापेक्षाही भयंकर आहेत हे कोवळ्या कळ्यांचे बळी जाताहेत यावरून सिद्ध होतेच आहे. तिथे कुठले

वेगळे पुरावे द्यायची गरजच काय आहे!

 

अत्यंत ढोंगी व लबाड आहे हा माणूस नावाचा प्राणी. त्याने या स्त्री नावाच्या भक्षाला आपल्या

टोकदार नखांच्या पंजात असे काही पकडले आहे की तिची सुटका कधी होईल हे देवच जाणे.

बैलाच्या पोळ्याला बैल पुजावे तसे महिला दिन

साजरे होतात. दोन दिवस आरती ओवाळली की

अत्याचार करायला मोकळे. लक्षात ठेवा, हे नराधम आपल्यातूनच येतात. किंबहुना आपणच

आहोत. मग त्यांना वठणीवर आणणार कोण?

नऊ वर्षांच्या चिमुरडीकडे वाकडा डोळा करून पाहताक्षणी तुम्ही त्यांना नरकात का पाठवत नाही हा प्रश्न स्वत:ला विचारा. आपली ती लेक

व दुसऱ्याची ती…? मादी! स्त्रीत तुम्हाला आई बहिण भाची का दिसत नाही? मादी हेच फक्त

तिचे स्वरूप आहे काय?

 

लग्न करून घरात आल्यापासून देहाच्या पायघड्या घालत ढाल बनून दारात उभी रहात

ती तुमचा दारूडा संसार सांभाळते हे तुम्हाला दिसत नाही का? लग्न होताच संसाराच्या बेड्या

तिला ज्या जखडतात त्या थेट सरणावर घेऊन जातात. आपल्या बंद मुठीत व बंद ओठातच

तिच्या दु:खाचा अंत फक्त धडधडणाऱ्या चितेतच

होतो

हे नग्न सत्य आहे. दुसऱ्याचीही आई बहिणच व तेवढीच पवित्र असते ना? मग तुम्ही

तुमची बुद्धी कुठे गहाण ठेवता. की हवस हेच फक्त तुमच्या जगण्याचे उद्दिष्ट आहे? जसजसा

काळ पुढे जातो आहे तसतसा माणूस आपली

सद् सद् विवेकबुद्धी गमावतो आहे. मागचा काळ

किती बरा होता असे म्हणण्याची वेळ आली आहे. रामराज्याला काळीमा फासणारी आमची जमात आहे. कोण सुधारणार आहे आम्हाला?

 

इंग्लंड जपान मध्ये स्त्रिया रात्री बेरात्री निर्धास्तपणे प्रवास करतात. आपण का इतके? घसरलो हो? आता माझ्या अंगणातून मुलीला कुणी उचलून नेईल इतकी भिती वाटते हो?

इतके असुरक्षित तर कधीच वाटत नव्हते. या साऱ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला आम्ही बांधिल आहोत हे विसरू नका. देवदूताची अपेक्षा नाही

हो. राक्षस बनू नका.. माणूस बना माणूस.. फक्त माणूस …

 

ही सारी मते माझी आहेत.

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा