*ज्येष्ठ कवी श्री मोहन मराठे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”गुरु एक तत्व”*
स्वामी – गजानन, दोन्ही एक
त्यांसी मी वंदितो,
गजानन – स्वामी गीत आळवितो / धृ/
भूपाळीचे सूर कानी आले
शहनाई चौघडे,नाद उठू लागले
मंदिरात स्वामी, गजानन घोष
त्या घोषांने,भान हरपतो. / गजानन स्वामी/
भक्त जनांत, उत्साह उधाण
नाम किर्तनात,नुरले देहभान
नको संसाराचा पाश, नको मोहमाया
गजानन – स्वामींशी पुन्हा मी स्मरीतो/ गजानन स्वामी/
गुरुराज आई, गजानन आई
तव दर्शनाची,लागलीसे घाई
मज पामरास, नाही तुमचा ठाव
कंठ दाटूनी,करुणा मी भाकितो / गजानन स्वामी/
गुरु एक तत्व,मायेचे ममत्व
ब्रह्मानंद,ब्रह्म तत्व विदेही स्वरूप
सोसवेना आता गुरु हो,हा भवताप
स्वामी गजानन, एक मी पहातो/ गजानन स्वामी/
रचना:– मोहन मराठे
