You are currently viewing थोडं माझं…. थोडं तुझंही!.
Oplus_16908288

थोडं माझं…. थोडं तुझंही!.

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*थोडं माझं…. थोडं तुझंही!.*

 

माणुस हा समुहप्रिय माणुस आहे. त्याला ‘ मी पणाची’खोटी झुल फारच आवडते. हा मी पणा अहंकार, स्वार्थ, फक्त माझंच, अशा खोट्या समजुतींनी वेढलेला असतो. पण हे समाधान फारच खोटे असते.कारण या अहंकाराचा दर्प इतरांना आवडत नाही व आप्त, मित्र ,सोबती दूर जातात, आणि मग त्याला आपण समाजापासुन दूर गेलो आहोत हे जाणवतं. पण तोपर्यंत ‘ हेकेखोर ‘ असा शिक्का बसतो व परत माघारी समुहात यायला ऊशीर होतो.

सुरवातच मुळी आई बाबांजवळ बालवयात केलेल्या बालहट्टांमुळे होते. आपले हट्ट पुरे होतात हे कळल्यावर ते नको इतके वाढतात.

हे हट्ट जसे मोठे होतो तसे चालत नाहीत. शाळेतील रांगेची शिस्त, गणवेष, ठराविकच डबा आणि वेळा , रोजचा अभ्यास हे म्हणुनच आहे. इथे हट्ट चालत नाही तर इतरांबरोबर तडजोड करावी लागते.

बरोबरचे सखे सवंगडी सुद्धा बहुमताचे ऐकतात. अपवाद म्हणुन कधी एखाद्याचे नेतृत्व मान्य करतात पण त्यासाठीही कणखरपणा असावा लागतो.

शाळा, काॅलेज, बसगाडी रिक्षा, रेल्वे,यासह आपली सोसायटी, शेजार, कर्मचारी वर्ग, या सर्वांशी आपला सतत संपर्क येत असतो.

इथे समजुन ऊमजुन थोडं तुझं थोडं माझं असं समजुतीनेच घ्यावे लागते.

अरेरावी करून चालत नाही. नाहीतर सतत वाद, भांडणे होतील पुढे ती विकोपाला जातील व मन:शांती हरवून जाईल. असं समाजात राहुन धीर, सोबत, आपुलकी मिळत नाही. कोणी आपल्या सुख दु:खात सहभागी होणार नाही. हे तर माणसांना अजिबात नको असतं. त्याला समाजाबरोबर रहायचं असतं. मग तडजोड हवीच.

समाजात, घरात, नातेवाईकात, मित्रमैत्रीणीत तडजोडीवरच संबंध घट्ट होतात. जिव्हाळा वाढतो.

मन समाधानी रहातं. सोबतीचा आधार मिळतो.

कधी तुमचं कधी आमचं असं करत सारे शांतपणे व संयमाने निभाऊन नेलं तरच शेवट आनंदी होतो.

आपलं सोडताना थोडं वाईट वाटतं. काहींना ती माघार ,पळपूटेपणा वाटतो. पण ते तसं नसतं. ऊलट ते सामंजस्य असतं जे आपल्याच हिताचे असते.

समाजात सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध, सर्वांकडे ये जा, गाठी भेटी , मदतीची देवघेव, असं असेल तरच व्यक्ती यशस्वी होते. फक्त जमिन जुमला, बंगले, श्रीमंती मिळवुन कोणीच समाधानी होत नाही.

संसाररथ आनंदात चालण्यासाठी पतीपत्नी, त्यांचे जवळचे गणगोत यांना नेहमीच तडजोड करावी लागते.

इतरांची मने जिंकण्यासाठी आपण आधी थोडं तुमचं थोडं माझं ही तडजोडीची वृत्ती स्विकारावी लागते.

मुळासकट हट्ट, अहंकार, स्वार्थावर घाव घालावा लागतो.

कोणाला वाटते तडजोड करायला लागणे हा सपशेल पराभव आहे.

पण लक्षात घ्यायला हवं कि, एक पाऊल काही काळ मागे घ्यावे लागले तरी विचार करून समजुतीने दुसरे पाऊल पूढे टाकून ती यशस्वी केलेली चढाई असते. यात वादा शिवाय शत्रू नामोहरम होतो व आपला दोस्त बनतो., आपला भर तर संवादावरच हवा.

आयुष्यात अनेक वेडी वाकडी वळणे येतात., काही सुखाची काही दु:खाची. एकटी व्यक्ती गडद अंधारात गुडूप होते. नैराश्य, अपमान, खंत, फसवणूक, एकटेपण अशा अवस्था त्याला गिळू पहातात.

जग तर फारच व्यवहारी आहे. जिवनात टिकून रहायचं असेल, समाधानी शांत स्वस्थ आयुष्य जगायचं असेल तर बालपण ते वृद्धावस्था, प्रसंगानुरूप स्थळ, समाज या सर्वच ठिकाणी विचारांची .. थोडे तुझे.. थोडे माझे. अशी संवादाने देवघेव केली तरच तडजोड होते व अगदी टोकाला न जाता. सर्व संकटातुन मार्ग सापडतो.

या जिवनात प्रत्येकाशी नाळ जुळलेली आहे. अरेरावी, हेकेखोर पणे किती जणांशी ती तोडुन टाकणार?

ऊलट ती जुळलेली ठेवणेच शहाणपणाचे आहे. आपल्या हिताचे आहे.

नेहमीच काही प्रसंगी एक पाऊल मागे घेणे, मार्गच बदलणे, निर्णय सोडुन देणे,किंवा एखादी इच्छाच मारावी लागणे. यासाठी मनाची संयमाने तयारी ठेवली तरच दुसरं पाऊल यशस्वीपणे चढाईसाठी टाकता येईल.

तडजोड ही सुखी व निरोगी आयुष्याची गुरूकिल्लीच आहे.

 

अनुराधा जोशी‌

9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा