*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार ज्येष्ठ साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट*
*भाग ४०*
*लगीनसराय*
“तुळशीचा लगीन झाला म्हंजे लगीनसराय सुरू झाली मां?” काकल्याने आल्या आल्या प्रश्न केला. मी हो म्हणालो. “पून तेच्या आदीय लग्ना झाली मरे?” काकल्या पुढे सरकला. “अरे ,तुलसी विवाहापूर्वीही मुहूर्त होतेच. या काळात कापणी पूर्ण झालेली असते. घरात धान्य असते, म्हणून या भातसराईच्या दिवसात लोकं निवांतपणे लग्न, त्याची बोलणी करायचे. आता काळ बदलला. लग्नं वर्षभर होत असतात. ” मी म्हणालो.
“काळ बदाललो ह्या खरा. आता बोलणी पोरांच करतत,आपण फक्त खर्च करायचो.” काकल्या मुद्द्यावर आला.”माका वाटणा नाय, आणखीन पन्नास वर्सानी लग्ना होतीत असां. लग्नाची गराजच संपान जायत्.” काकल्याच्या स्वरात चिंता होती.
“बरोबर, विवाहसंस्था अडचणीत आहे, हे खरं. मुलींची संख्याच कमी होत चाललीय. ” मी म्हणालो.
“तसाच काय नाय. इतको फरक नाय आसा. आवाठात धा-धा पोर बिनलग्नाचे आसत. हेचा कारण मुलींची संख्या ह्या नाय.”
“मग?”
” अरे ,आज लग्नाची गराज आसा, ती पोरग्यांका. चेडवांका तितकीशी गरज नसाची. ” काकल्या काहीतरी तिरकस बोलेल, असं वाटंतच होतं. पण तो सत्य सांगत होता. म्हणाला,”अरे, पूर्वी मुलींका पुरुषांचो सहवास मेळा नाय. मुली कसाय करून जमवन् घेयत्. आता ती परस्थिती उरली नाय.” काकल्या बरोबर बोलला.
“दुसरा म्हंजे, पूर्वी पुरुष काम करून कमयत् आनी बायले रांधा वाढा उश्टी काढा हेच्यात रमत. आता झिलग्यांच्या बरोबरीन पोरगी पून कमायतत. झिलगे थयच रवले. कमावचा आणि घर समाळूचा अशी दोनय कामा चेडवानीच कित्या करूची? पोरग्यानी सुधारणा गरजेचा हा. घोवांनी बायले बरोबरीन रांधूचा, घर समाळूचा हेच्यात पडाक होया. नायतर लग्ना होवची नाय आनी टिकाचीय नाय. लगीनसराय सोडा, लग्नाच सरतीत. ” सत्य उघडं करीत काकल्या चालू पडला.
*विनय वामन सौदागर*
आजगाव, सावंतवाडी.
9403088802
