कथित खंडणी प्रकरणात आरोपी सुरेश झोरे यांना रु. 50,000 जामिनावर मुक्तता
वकील अश्फाक शेख यांचा बचाव पक्षात उल्लेखनीय यश
कुडाळ
कुडाळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. गजानन कुळकर्णी यांनी कथित खंडणी प्रकरणातील आरोपी सामाजिक कार्यकर्ते सुरेश झोरे यांना रु. 50,000/- च्या जामिनावर काही अटींसह मुक्त करण्याचे आदेश दिले. या निर्णयामागे वकील ऍडव्होकेट अश्फाक शेख यांनी मांडलेला प्रभावी बचाव युक्तिवाद ठरला.
सिद्धिविनायक बिडवलकर खून प्रकरणातील तडीपार आरोपी सिद्धेश शिरसाठ याची पत्नी सिद्धी शिरसाठ हिने ॲड. किशोर वरक आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश झोरे यांच्यावर सिद्धेश शिरसाठ यास मकोका लागू न करण्याच्या मोबदल्यात दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याची, तसेच त्यातील एक लाख रुपये स्वीकारल्याची फिर्याद कुडाळ पोलीस ठाण्यात नोंदवली होती. या फिर्यादीच्या आधारे तीन दिवसांपूर्वी झोरे यांना पोलिसांनी अटक केली होती.
न्यायालयात हजर असताना, ऍडव्होकेट अश्फाक शेख यांनी या फिर्यादीवर युक्तिवाद केला. त्यांनी सांगितले की, फिर्याद 4 महिने 11 दिवस उशिरा दाखल झाली असून ती खोटी आणि खोडसाळ आहे. आरोपीने खंडणी मागितली किंवा स्वीकारली नाही, तसेच झडतीत काहीही सापडलेले नाही. खून प्रकरणातील वैमनस्यामुळे ही फिर्याद दाखल करण्यात आली असून कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत.
यावर न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद मान्य करून सुरेश झोरे यांची रु. 50,000 च्या जामिनावर मुक्तता केली. या प्रकरणात सुरेश झोरे यांच्या वतीने ऍडव्होकेट अश्फाक शेख आणि ॲड. पंकज खरवडे यांनी काम पाहिले.
