ग्रहण लागण्याच्या काळात लेखकाने प्रश्नच विचारायला हवेत
प्रभा प्रकाशन आणि अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंच आयोजित अक्षरवैभव संमेलनाचे अध्यक्ष कवी सायमन मार्टिन यांचे प्रतिपादन
वैभववाडी साहित्य संमेलनाला पश्चिम महाराष्ट्र,कोल्हापूर, सिंधुदुर्गातून रसिक उपस्थित
वैभववाडी
कठीण काळात कवी लेखक कुणाच्या बाजूने उभा असतो यावर त्याच्या लेखनाचा कस लागत असतो. म्हणून आजच्या ग्रहण लागलेल्या काळात लेखकाने प्रश्नच विचारायला हवेत. कवी लेखक हा या समाजाचाच एक भाग असल्यामुळे साहित्यिकांनी समाजाचाच भाग बनून समाजाचे प्रश्न मांडायला हवेत असे प्रतिपादन नामवंत ज्येष्ठ कवी सायमन मार्टिन यांनी प्रभा प्रकाशन कणकवली आणि अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंच वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वैभववाडी येथे आयोजित केलेल्या पहिल्या अक्षरवैभव साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना केले.
वैभववाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित केलेल्या या संमेलनाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते विजय तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या कार्यक्रमाला प्रभा प्रकाशनाचे संचालक कवी अजय कांडर अक्षरवैभवचे अध्यक्ष प्रा.एस.एन.पाटील, सुप्रसिद्ध दिग्दर्शक दीपक कदम, समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव, कवी प्रा.डॅा. नामदेव गवळी, कवी महावीर कांबळे, कादंबरीकार पांडुरंग पाटील, कादंबरीकार श्वेतल परब आदी उपस्थित होते. यावेळी प्रभा प्रकाशनाचा शालन कांबळे स्मृती माणगाव परिषद गौरव कादंबरी पुरस्कार कादंबरीकार पांडुरंग पाटील यांना तर प्रभा प्रकाशनाचा प्रभावती कांडर स्मृति आवानओल पुरस्कार श्वेतल परब यांना प्रदान करण्यात आला. यावेळी कवी सफरअली इसफ, कवी महावीर कांबळे, पंडित कांबळे, विठ्ठल कदम यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कवी मार्टिन म्हणाले,बोलून काय होणार आहे ? लिहून काय होणार आहे ? ही अफवा त्यांनीच पसरवलेली असते ज्यांना बोलणाऱ्याची आणि लिहिणाऱ्यांची भीती वाटत असते. आपण त्यांच्या कटाला जर बळी पडलो तर एक एक करून आपलाही बळी जाईल. म्हणून ऐकणाऱ्याला आपली भाषा अवगत नसली तरीही आपण बोलत राहायचं असते.
त्यांना काही कळणारच नाही असं नाही. आपण बोलत असताना ते आपला चेहरा वाचतील आणि त्यातून आपला संवाद होईल. अनेकदा नकारात्मक भावाचं, द्वेष पसरवणारं आणि माणसा माणसामध्ये धर्म, जात, पंथ व भाषेच्या मुद्द्यावरून फूट पाडणारे विचार पसरवले जातात. त्यामुळे एकूणच वातावरण अस्वस्थ आणि भीतीग्रस्त होते. या सर्व अशांत काळात लेखकाची जबाबदारी मोलाची असते.या अंधाराच्या काळात सर्व धोके पत्करून म्हणूनच बोलत राहणे, लिहीत राहणे गरजेचं आहे. ज्या काळात कविता लिहिणे हा दखलपात्र अपराध झालेला असताना, न्यायालयं कोसो मैल दूर गेलेली असताना, न्यायाधिशाच्या डोळ्यावरची पट्टी हरवलेली असताना बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी योग्य काळ नसतानाच्या युगात बोलत राहिलं पाहिजे. याच विश्वासावर की कुठलीच कबर सत्य दडपू शकत नाही. यावेळी उद्घाटक तावडे यांनी वैभववाडी सारख्या भागात साहित्याची चळवळ नव्याने सुरू होते ही मोठी सांस्कृतिक घटना असल्याचे सांगितले तर प्रमुख पाहुणे श्री, संदीप पाटील यांनी पुढील संमेलनाची पूर्ण जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे घोषित केले. तर अजय कांडर यांनी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या भूमीत हे पहिले अक्षरवैभव साहित्य संमेलन आयोजित करून वैभववाडीत सांस्कृतिक ओलावा निर्माण करण्याचं काम करण्यात आले आहे मात्र सर्वांच्या सहकार्यामुळेच हे संमेलन यशस्वी होत असल्याचे सांगितले.
यावेळी महावीर कांबळे, दीपक कदम, पांडुरंग पाटील, श्वेतल परब यांनीही विचार व्यक्त केले. कवी नामदेव गवळी यांच्या अध्यक्षतेखाली आणि कवी महावीर कांबळे यांच्या प्रमुख उपस्थित निमंत्रितांचे कवी संमेलन झाले. यात संध्या तांबे, सफरअली इसफ, भालचंद्र सुपेकर, हरिचंद्र भिसे, संजय तांबे, प्रेमानंद रावराणे, डॉ. राजेंद्र पाताडे, माधव गावकर, नंदिनी पवार -रावराणे, प्रज्ञा मातोंडकर, चेतन बोडेकर, प्रफुल्ल जाधव, संदेश तुळसणकर, निशिगंधा गावकर, निकेत पावसकर, सायली नारकर, आश्विनी कोकाटे-बिले, मयुरी पेडणेकर, ऋचा पवार, शैलेंद्रकुमार परब, सचिन दरपे, निलेश कारेकर आदी सुमारे ६० कवींनी आपल्या कवितेचे सादरीकरण केले. पहिल्या उद्घाटन व पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एस.एन. पाटील यांनी केले.
प्रा.संजीवनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर आभार संदेश तुळसणकर यांनी मानले.
काव्य वाचन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केतन बेडेकर व प्रफुल्ल जाधव यांनी केले तर आभार एस.एन.पुरीबुवा यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंचाचे अध्यक्ष प्रा.एस. एन. पाटील, उपाध्यक्ष एस. एन. पुरीबुवा, कार्याध्यक्ष रवींद्र पवार, सचिव चेतन बोडेकर, सहसचिव संदेश तुळसणकर, खजिनदार प्रफुल्ल जाधव, प्रसिद्धी प्रमुख मारुती कांबळे, सल्लागार सफरअली इसफ, शैलेंद्रकुमार परब यांनी परिश्रम घेतले.
