You are currently viewing २१ नोव्हेंबरला आरवलीत श्री देव वेतोबा जत्रोत्सवाचा उत्साह

२१ नोव्हेंबरला आरवलीत श्री देव वेतोबा जत्रोत्सवाचा उत्साह

वेंगुर्ला / आरवली :

श्री देव वेतोबा देवस्थान, आरवली येथील वार्षिक जत्रोत्सव यंदाही मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा होणार आहे. परंपरेप्रमाणे श्री देव वेतोबाचा वार्षिक जत्रोत्सव मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा शके १९४७, शुक्रवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह सुरुवात होणार आहे.

या दिवशी सकाळी पूजाविधी, दर्शन सोहळा, रात्री श्री ची पालखी प्रदक्षिणा, दारू सामानाची आतषबाजी, अन्नशांती समराधना आणि दशावतारी नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवार, २२ नोव्हेंबर २०२५, सकाळी तुलाभार, गुणीजन गायन अशा कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय होणार आहे. याच दिवशी श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सवही पार पडणार आहे. यामध्ये पूजाविधी, ओटी भरणे, रात्री पालखी प्रदक्षिणा, दारू सामानाची आतषबाजी तसेच नाईक मोचेमाडकर दशावतारी नाटक कंपनीचे नाट्यप्रयोग रंगणार आहेत.

भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव वेतोबा देवस्थान समिती, गावकरी, मानकरी तसेच आरवली ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा