मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला व वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालय आणि श्री. एम. पी. शाह कला व वाणिज्य कनिष्ठ महिला महाविद्यालय यांनी “छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ल्यांच्या प्रतिकृती निर्माण करून ऐतिहासिक वारसा संवर्धन” हा उपक्रम राबवत महाराष्ट्र शासनाच्या दुर्गोत्सव २०२५ मध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला. प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांच्या संकल्पनेतून आकार घेतलेल्या या उपक्रमांतर्गत “चला किल्ले बनवूया स्पर्धा (Fortress Replica Competition)” ही किल्ल्यांच्या प्रतिकृती बनविण्याची स्पर्धा ६ व ७ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीचे मा. सचिव डॉ. भारत पाठक यांच्या हस्ते झाले. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील एकूण ८२ विद्यार्थिनींनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग दर्शविला.
दिवाळीच्या दिवसांत शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची प्रतिकृती बांधण्याची परंपरा ही केवळ मातीशी खेळण्यापुरती मर्यादित नसून देशभक्ती, परंपरा आणि संस्कृतीची जपणूक करणारा सशक्त सांस्कृतिक धागा म्हणून ओळखली जाते. विद्यार्थिनींनी या परंपरेचा वारसा लक्षात ठेवत रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग अशा किल्ल्यांच्या मोहक प्रतिकृती साकारल्या. विशेष म्हणजे, शंभर टक्के पर्यावरणपूरक साहित्य—जुने वर्तमानपत्र, माती, चिकणमाती, तुटलेल्या विटा, दगड, झाडांच्या फांद्या, पाने आणि दिवे—यांचा वापर करून विद्यार्थिनींनी किल्ल्यांचे ऐतिहासिक वैभव सजीव केले. स्पर्धेदरम्यान त्यांनी उपस्थितांना शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहास, किल्ल्यांचे वारसास्थळ आणि त्यांचे सामाजिक महत्त्व आत्मविश्वासाने व उत्साहाने समजावून सांगितले.
तीव्र स्पर्धेत तीन समूहांनी विजेतेपद पटकावले—प्रथम क्रमांक रायगड मावळे समूह, द्वितीय क्रमांक प्रतापगड मावळे समूह आणि तृतीय क्रमांक सिंधुदुर्ग शूरवीर समूह. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये शिवकालीन इतिहासाविषयी अभिमानाची भावना दृढ झाली आणि त्यांनी यूनेस्को वारसा स्थळांचे महत्त्व जाणून घेतले. स्पर्धेचे सुरळीत आयोजन व्हावे यासाठी प्रा. सतीश पवार आणि प्रा. संदीप ढोण यांनी विद्यार्थिनींना सातत्यपूर्ण मार्गदर्शन केले.
या उपक्रमाला प्राचार्य डॉ. अर्चना पत्की, उपप्राचार्या अल्पा दोशी, पर्यवेक्षिका वर्षा पालकर, संजय सोनवणे आणि डॉ. सीमा शाह यांचे सततचे प्रोत्साहन व मौल्यवान मार्गदर्शन लाभले. किल्ल्यांचे वारसास्थळ, इतिहास आणि संस्कृती यांची स्मृती जपणारा आणि विद्यार्थिनींमध्ये राष्ट्राभिमान चेतवणारा हा उपक्रम अत्यंत यशस्वी रीतीने पार पडला.
