You are currently viewing महिला दिवस सन्मान की कुचेष्टा

महिला दिवस सन्मान की कुचेष्टा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*

 

*महिला दिवस सन्मान की कुचेष्टा*

 

आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागल्या आहेत. कोणतेही क्षेत्र असे नाही, की त्यात स्त्रीचा वावर दिसत नाही.

एक क्रिकेट हा खेळ असा होता की तिथे मुलांची मक्तेदारी होती, पण एकविसाव्या शतकात या खेळातही मुलींनी त्यांचे प्राविण्य दाखविले आहे. भारताकडून खेळणाऱ्या शेफालीने वर्ल्ड कप खेचून आणलाच की नाही? समस्त महिला वर्गाची मान ताठ झाली आहे.

 

अशा परिस्थितीत माझ्या मनात असा प्रश्न येतो की, महिला दिन, गृहिणी दिन असे वेगवेगळे दिन का साजरे केले जातात? खरं सांगायचं तर हल्ली रोजच कोणता ना कोणता जागतिक दिन साजरा करण्याचे प्रस्थ जास्तच बोकाळले आहे.

 

आठ मार्चला महिलांना, तीन नोव्हेंबरला गृहिणींना विशेष महत्त्व देऊन दिन साजरा केला की झाले का? मग बाकीच्या दिवशी पुन्हा त्यांना उपभोग्य वस्तू समजणे, त्यांची मानहानी करणे, पुरुषांपेक्षा त्यांना कमी लेखणे, त्यांच्यावर अरेरावी करणे, आणि सर्वच बाबतीत त्यांना गृहीत धरणे, या गोष्टींचे जणू काही लायसन्स मिळाले आहे का पुरुषांना?

 

नोकरी करणाऱ्या अनेक स्त्रिया मी पाहिल्या आहेत. विशेषतः ज्या स्त्रियांची मुले लहान असतात, त्यांची तर फारच तारेवरची कसरत असते. कधी मुल आजारी असले, तरी रजा आईलाच घ्यावी लागते. मग त्या दिवशी तिची एखादी अतिशय महत्त्वाची मीटिंग किंवा प्रेझेंटेशन असले तरी. नवऱ्याला कधी ऍडजस्टमेंट करताच येत नाही. किंबहुना त्याच्या दृष्टीने तिचे काम दुय्यमच असते. अशावेळी स्त्रीची मानसिक परिस्थिती फारच बिकट होते.

 

कितीतरी नवरे तर अगदी सहजच बोलतात, ” तुला नसेल झेपत तर सोडून दे नोकरी. ” जसे काही त्याला तिच्या नोकरीचा काही फायदा नसतोच.

 

गृहिणीला तर फारच कमी लेखण्यात येते. अहो, एखाद्या महिलेला आपण विचारले की तुम्ही काय करता? तर तिचे उत्तर काय असते? ती सांगते, ” काही नाही, मी घरीच असते. होम मेकर आहे किंवा हाऊस वाईफच आहे. ” म्हणजे ती स्वतःच स्वतःला इतर बाहेर काम करणाऱ्या स्त्रियांपेक्षा कमी समजते, हे चुकीचे नाही का?

 

गृहिणीचे काम सोपे आहे का हो? घरातल्या सर्वांच्या वेळा सांभाळणे, नवऱ्याचा मुलांचे डबे भरणे, नाश्ता, स्वयंपाकपाणी, घरात काय हवे नको ते पाहून त्याप्रमाणे वाणसामान भरणे, बाजारहाट करणे, मुलांचे अभ्यास, शाळेतील पेरेंट्स- टीचर मीटिंग, घरात सासू-सासरे असतील तर त्यांच्या औषधांच्या वेळा, त्यांना काय हवे नको ते पाहणे. बापरे! गृहिणीच्या कामाची यादी तर न संपणारीच आहे.गृहिणी ही तिच्या संसाराची पंतप्रधान आहे.

 

असे असताना पतीने पत्नीला एखादे काम सांगितले, आणि काही कारणास्तव ते काम त्याच दिवशी तिला करता आले नाही, तर पतीचा राग तर सहन करावा लागतोच, पण त्याचे, ” दिवसभर काय करतेस ग? इतके सुद्धा काम तुला करता आले नाही? ” हे शब्द पत्नीच्या जिव्हारी लागल्याशिवाय कसे बरे राहतील?

 

आज एकविसाव्या शतकातही, सामाजिक, वैज्ञानिक क्रांतीच्या या काळात असे चित्र घरोघरी पाहण्यास मिळते याचा खेद वाटतो.

 

नुसते दिन साजरे करून काय साधणार? स्त्रियांना, मुलींना त्यांचा योग्य दर्जा कायम कसा मिळत राहील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

 

संसार हा पती-पत्नी दोघांचा असतो. पण सासरी जाताना मुलीची आई तिच्या मुलीला हेच सांगते की बाई ग, तुला सर्वांची मर्जी सांभाळायची आहे. सगळ्यांचा मान राखायचा आहे आणि मुख्य म्हणजे कुठे काही वाद निर्माण झाला तर तडजोड तुलाच करायची आहे, हे लक्षात ठेव.

असा उपदेश मुलाला त्याची आई करते का कधी?

समाजाची ही घडण जेव्हा बदलेल तेव्हाच आज वाढलेले घटस्फोटांचे प्रमाण कमी होईल.

खर्‍या अर्थाने स्त्री व पुरुष यांच्यात समान दर्जा प्राप्त होईल.

 

* अरुणा मुल्हेरकर*

* मिशिगन*

प्रतिक्रिया व्यक्त करा