*मनस्पर्शी साहित्य कला-क्रिडा प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे लिखित पत्र*
!! श्री !!
प्रिय नदीमाय ,
साष्टांग दंडवत !
आज इतका आनंद झालाय की, तुझ्या जळासारखा ओसंडून वहातोय. तोच तुला सांगायचाय म्हणून हा पत्रप्रपंच.
यंदा भरपूर पावसाने कितीतरी वर्षांनी तू आमच्या भेटीला आलीस. आजोळची माणगंगा तू, पुन्हा वाहती झालीस. पाणीच पाणी बघून अपार आनंद झाला.
हळूहळू तू आटलीस. पात्र पूर्ण कोरडे पडले. वैराण, रखरखीत होऊन
गेले .तिथली कोरडी वाळू तुझ्या अस्तित्वाची खूण सांगायची. तिथे पुन्हा पाणी वहायला लागल्यावर त्या मातीने, वाळूने सुध्दा आनंदाचे अश्रू गाळले. समाधानाचा दरवळ सुटला. त्या क्षणाची अपूर्वाई केव्हढी म्हणून सांगू ?
अग, तुझ्या अंगा-खांद्यावर खेळत बागडत मोठे झालो. तुझं निर्मळ वाहतं रूप, स्वच्छ नितळ पाणी, दोन्ही तीरावर हिरवीगार झाडी, वाळूचं पात्र, शुद्ध हवा, पाणी सगळंच किती छान, हवंहवंसं होतं. पोहतानाचा तुझा तो उबदार मायेचा स्पर्श आजही आठवतो. सगळ्यांना समृध्द करीत आनंदाचे मळे फुलवलेस.
पण तुझी वत्सलकृपा आम्ही विसरतो. पात्र मलीन करणे, अपरिमीत जलप्रदूषण, पाण्याची नासाडी करून पावित्र्यच घालवतो. जमिनीच्या हव्यासापायी तुला संकुचितही केली. आमच्या कृतघ्नपणावर तू मधूनच पुराचे तडाखे देतीस.तरी आमच्यात सुधारणा कमीच.
एका धारेतून उत्पन्न होऊन तू स्वच्छंद, झुळझुळणारं बाल्य उपभोगतेस. पुढे खळाळणारे, उसळणारे तारुण्य दाखवतेस. प्रसंगी कड्यावरून झेपावत आयुष्यातल्या धाडसाचे प्रात्यक्षिक दाखवतेस. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कधीतरी असं धाडसही खूप गरजेचं असतं. पुन्हा शांत होत संयमित होण्याचा धडाही देतेस. आईच्या मायेने सर्वाना एकच माया, समान वात्सल्य देतेस. फळत्या – फुलत्या जीवनाचे वरदान देतेस.
प्रत्येकाने आपली मर्यादा, बंधने सोडायची नाहीत. नैसर्गिक गुणधर्म न सोडता वृद्धिंगत करायचे. दुसऱ्यांचे हीतच करायचे हे तुझ्या आचरणातून दाखवतेस. स्वत: आनंदाने जगत आनंद वाटायला शिकवतेस.
पण माते, विकासाच्या वाऱ्याने आमचे भान हरपलेय. तूच आम्हाला सद्बुद्धी देऊन योग्य मार्गावर आण. निसर्गाशी आमचं नातं पुन्हा जीवलगाचं होऊ दे. तुझी स्वच्छता, पुनर्जिवीत प्रकल्प राबवले जाऊ लागलेत त्याला यश येऊ दे. निसर्गास जपून जलजीवन स्वच्छ समृद्ध राखण्याची सन्मती दे. इतक्या वर्षांनी तू परत आलीस. आता तुझे कायम वास्तव्य असू दे आणि तनमन सुखावणारे तुझे दर्शन नित्य घडू देत.
तुझीच लेक,
ज्योत्स्ना
*ज्योत्स्ना तानवडे, पुणे*
०५.१०.२०२५
